
संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथे मूर्तीकार अविराज कानसरे यांनी साकारली गणपती बाप्पाची वस्त्रधारी अवताराची मूर्ती
संगमेश्वर तालुक्यातील कसबा गावातील युवा मुर्तिकार अविराज कानसरे यांनी यंदा गणेशभक्तांसाठी एक वेगळा प्रयोग साकारला आहे. पारंपारिक रंगसंगतीबरोबरच खर्या कपड्यांचा फेटा, धोतर आणि शेला परिधान केलेल्या गणेशमूर्ती त्यांच्या मूर्तीशाळेत तयार होत आहेत.
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असल्याने कसबा येथील अविराज कला केंद्रमध्ये सध्या कामाची लगबग सुरू आहे. यंदा कानसरे यांनी २५ हून अधिक मूर्तीना हा अनोखा साज चढवला आहे. मूर्तीला वस्त्रांचा पेहराव करण्यासाठी साडेतीन तासांहून अधिक वेळ लागतो. प्रत्येक मूर्तीच्या रंगसंगतीनुसार बाजारातून कापड आणून त्याला सोनेरी काठ लावला जातो आणि मग बाप्पांच्या अंगावर नेसवला जातो.
अविराज सांगतात लहानपणापासून वडील आणि काकांसोबत मूर्ती घडवायला सुरूवात केली. मुंबईत एका कारखान्यात खर्या वस्त्रातील बाप्पा पाहिला आणि प्रेरणा मिळाली. तेव्हापासून हा प्रयोग आपल्या गावात सुरू केला.www.konkantoday.com




