
शेतकर्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी शेतकर्यांचा आक्रोश
मंगळवार दि. १९ ऑगस्ट रोजी शेतकर्यांच्या २०१५ पासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, सिव्हिल हॉस्पिटल जवळ येथे महत्वपूर्ण सभेचे आयोजन करण्यात आले. मुसळधार पावसाची संततधार सुरू असतानाही जिल्ह्यातील विविध गावांमधून शेतकर्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. मागण्या पूर्ण करण्यासाठी १५ दिवसांचा अल्टीमेटम देण्यात आला आहे.
सकाळी १०.३० वाजता सुरू झालेल्या या सभेला श्री. जाधव, विनय मुकादम, अशोक भाटकर यांनी मार्गदर्शन केले. शेवटी प्रकाश उर्फ बाबा साळवी यांनी शेतकर्यांच्या प्रलंबित मागण्यांवर सविस्तर भाष्य केले. त्यांनी सांगितले की, २०१५ पासून शेतकर्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. कोविड काळातील लॉकडाऊनमुळे झालेले प्रचंड नुकसान, माकड-वानरांचा उपद्रव आणि इतर अनेक प्रश्न अद्याप मार्गी लागलेले नाहीत. यावर तोडगा निघण्यासाठी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना जिल्हाधिकारी मार्फत निवेदन सादर करण्यात आले. शासनाने वेळेत निर्णय न घेतल्यास शेतकरी रस्त्यावर उतरेल, मात्र मुख्यमंत्री अशी वेळ येवू देणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या सभेला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे पदाधिकारी उपस्थित राहून शेतकर्यांना पाठिंबा दिला.
www.konkantoday.com




