
वेदांत आजही जीवनदृष्टी देणारा मार्ग
प्रा. कश्मिरा दळी; गोगटे महाविद्यालयात संस्कृत दिन
रत्नागिरी : “प्रत्येक मनुष्य हा जीवनात आनंद मिळविण्यासाठी सतत प्रयत्नशील असतो. वेदांत दर्शन जरी प्राचीन असल्याचे वाटत असले आणि ते केवळ सेवानिवृत्ती किंवा वृद्धावस्थेत वाचायचे असते, असा जनमानसातील समज असला, तरी प्रत्यक्षात वेदांत हा जीवनदृष्टी प्रदान करणारा असल्यामुळे त्याच्या अभ्यासासाठी कोणतीही वयोमर्यादा नाही. वेदांत जीवनदृष्टी प्रदान करते; वेदांतातील तत्त्वे आजही अनुपालनयोग्य आहेत,” असे प्रतिपादन भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्रातील प्राध्यापिका कश्मिरा दळी यांनी केले.
गोगटे-जोगळेकर महाविद्यालय व संस्कृत भारती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संस्कृत दिन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. त्यांनी व्याख्यानात वेदांताचे आधुनिक काळातील औचित्य या विषयावर सविस्तर प्रकाश टाकण्यात आला. त्यांनी दर्शनशास्त्रातील षड्दर्शनपैकी वेदांत दर्शनाचे स्थान स्पष्ट केले. जीव, जगत, ईश्वर, माया, मोक्ष आणि मोक्षसाधन कर्म इत्यादी मूलभूत संकल्पनांची तत्त्वज्ञानिक मांडणी केली. वेदान्तातील प्रत्येक वेदाशी निगडित असलेल्या महावाक्यांचा थोडक्यात परिचय दिला. “ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या” या वाक्याचे दैनंदिन जीवनातील उदाहरणांसह स्पष्टीकरणही केले.
या प्रसंगी कला शाखा उपप्राचार्या व संस्कृत विभागप्रमुखा डॉ. कल्पना आठल्ये, संस्कृत भारतीच्या अक्षया भागवत या प्रमुख उपस्थित होत्या. प्रा. स्नेहा शिवलकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व प्रा.प्रज्ञा भट यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. कला शाखा उपप्राचार्या व संस्कृत विभागप्रमुखा डॉ. कल्पना आठल्ये यांनी अध्यक्षीय मनोगतात संस्कृतदिनाचे महत्त्व सांगून सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. संस्कृत विभागातील तृतीय वर्षाची विद्यार्थिनी कु. तेजस्विनी जोशी हिने सांस्कृतिक कार्यक्रम आणि सभाकार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रा. प्रीती टिकेकर यांनी धन्यवाद वितरण करून शान्तिमन्त्राने कार्यक्रमाची सांगता केली.
गोगटे जोगळेकर महाविद्यायाच्या कलाशाखेचे प्राध्यापक, राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. निलेश पाटील, मराठी विभागाच्या प्राध्यापिका डॉ. निधी पटवर्धन, संस्कृतभारतीचे कार्यकर्ते, आजी व माजी विद्यार्थी,पालक आणि संस्कृतप्रेमी असे अंदाजे ६५ जण कार्यक्रमाला उपस्थित होते.
चौकट
सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये “मुदाकरात्तमोदकम्” स्तोत्रगायन प्रथम वर्षाच्या वैभवी जोशी या विद्यार्थिनीने केले. “TVC वार्ता विनाकारिणी” नावाची छोटी नाटिका वरदा बोंडाळे, कनक भिडे, सायली ताडे, चिन्मयी सरपोतदार, आर्या मुळ्ये, ओंकार खांडेकर या पदव्युत्तर द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी सादर केली. “मधुराष्टकम्” या स्तोत्रवर वेदश्री बापट हिने नृत्य सादर केले. हास्यविनोदपूर्ण “चर्पटपञ्जरी” नामक संवाद पदव्युत्तर प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनी मनस्वी नाटेकर, अक्षरा भट, मीरा काळे व कल्पजा जोगळेकर यांनी सादर केला. प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनींनी “मनसा सततं स्मरणीयं“ हे गीत सादर केले. संतोषी गिरी, साक्षी शेवडे, मधुश्री वझे, स्मितल बेंडे, स्नेहा कोकरे या विद्यार्थिनींनी मंगळागौर महिला संवाद सादर केला. चारुदत्त भडसावळे या भारतीय संस्कृती या विषयावर संस्कृतमधून भाषण केले. संस्कृत विभागाचे विद्यार्थी ओंकार खांडेकर व चैतन्य अभ्यंकर यांनी तबला वादन केले. पदव्युत्तर द्वितीय वर्षाच्या कनक भिडे व वरदा बोंडाळे या विद्यार्थिनींनी शिवतांडव स्तोत्रावर नृत्य सादर केले. पूर्वा खाडीलकर, वेदश्री बापट, दीप्ती गद्रे, चिन्मयी टिकेकर, हिमानी फाटक, चैतन्य अभ्यंकर या तृतीय वर्षं संस्कृत विभागाच्या विद्यार्थ्यांनी “अभिनेतृणाम् अन्वेषणम्” नामक स्किट सादर केले.