
तळवली पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी रस्त्याच्या दुरवस्थेवरून जाहीर केलेले रास्तारोको आंदोलन अखेर तूर्तास स्थगित
तळवली पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी रस्त्याच्या दुरवस्थेवरून जाहीर केलेले रास्तारोको आंदोलन अखेर तूर्तास स्थगित करण्यात आले आहे. याबाबत ग्रामसभेच्या ठरावानुसार आंदोलनाची तयारी सुरू असतानाच सार्वजनिक बांधकाम विभागाने या प्रश्नाची दखल घेतली.
शेवरीफाटा ते हॉस्पिटल स्टॉप या मुख्य रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी सार्वजनिक बांधकाम विभाग गुहागरचे उपअभियंता एस. एम. पाटील आणि सहाय्यक अभियंता आर. बी. ओतारी यांनी केली. तसेच कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग चिपळूणचे श्री. सुखदेवे यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधण्यात आला. यावेळी प्रा. अमोल जड्याळ यांनी पुढाकार घेत अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
दरम्यान, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण (दिशा) समिती सदस्य मा. सुरेशदादा सावंत यांनी देखील या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून त्यांच्या समवेत उपस्थित राहून या चर्चेला पाठिंबा दिला. अधिकाऱ्यांनी रस्त्याचा परिपूर्ण प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवून पक्का डांबरी रस्ता लवकरात लवकर व्हावा, यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
या घडामोडींमुळे ग्रामस्थांनी आंदोलनाची भूमिका योग्य ठरल्याचे सांगितले असून प्रशासनाकडून सकारात्मक चर्चा झाल्याने आंदोलन तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तथापि, रस्ता पूर्ण होईपर्यंत ग्रामस्थ प्रयत्नशील राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.