गिरगाव चौपाटीवर ब्लू बॉटल जेलीफिश!

मुंबई : मागील दोन – तीन दिवस कोसळलेला मुसळधार पाऊस आणि समुद्राकडून जमिनीच्या दिशेने वाहणारे वारे यामुळे गिरगाव चौपाटीवर जेलीफिशसदृश विषारी ब्लू बॉटलचा वावर वाढला आहे. दरवर्षी याच सुमारास मुंबईमधील समुद्रकिनाऱ्यांवर ब्लू बॉटल दृष्टीस पडत असून अनेक पर्यटकांना त्यांनी दंश केल्याच्या घटना घडल्या आहेत.

ब्लू बॉटल हा समुद्री जीव असून त्याचे नाव त्याच्या आकारावरून आणि दिसण्यावरून पडले आहे. निळ्या रंगाचे असंख्य धागे (शुंडक) आणि त्यावर हवा भरलेला एक अपारदर्शक फुगा यामुळे ब्लू बॉटल समुद्रात तरंगतात. दरम्यान, मुंबईच्या सागरी परिसंस्थेत तीन प्रकारचे जेलीसदृश जीव आढळतात. ठरावीक वातावरणात ते किनाऱ्यालगत येतात. पावसाळ्यापूर्वी ‘ब्लू बटन’, पावसाळ्यात ‘ब्लू बॉटल’ आणि पाऊस ओसरल्यावर ‘बॉक्स’ जेलीसदृश जीव किनाऱ्यावर आढळतात. त्यातील ब्लू बॉटल हा जीव विषारी म्हणूनच ओळखला जातो.

हे समुद्री जीव पावसाळ्यात मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर दिसतात. समुद्राचे तापमान वाढल्यामुळे ब्लू बॉटलचे पुनरुत्पादन वाढले आहे. तसेच समुद्रातील वाढत्या कचऱ्यामुळे त्यांना भरपूर खाद्यही मिळते. मुंबईतील गिरगाव, जुहू, वर्सोवा, अक्सा आणि दादर या समुद्रकिनाऱ्यांवर ब्लू बॉटल आढळतात. दोन दिवसापूर्वी गिगराव चौपाटीच्या किनाऱ्यावर वन्यजीव, समुद्री अभ्यासक सहिर दोशी यांना ब्लू बॉटल दिसले.

विषारी धागे धोकादायक

ब्लू बॉटलच्या विषारी धाग्यांना (शुंडक) मानवी स्पर्श झाल्यास ते दंश करतात. हा दंश अतिशय वेदनादायी असतो. किनाऱ्याला आल्यावर त्यांच्यापैकी बहुतेक जीव मृतावस्थेत वाटले, तरीही ते दंश करू शकतात. मानवाचा या धाग्यांना स्पर्श झाल्यास त्वचेवर लाल चट्टे येतात आणि आग होते. काही वेळा दंश झालेल्या भागावर सूज येऊन प्रचंड वेदना होतात. हे जीव दंशाचा वापर शिकार करण्यासाठी आणि स्वत:च्या रक्षणासाठी करतात. गतवर्षी जुहू चौपाटीवर पर्यटकांना जेलीफिशने दंश केला होता.

दंश झाल्यास काय करावे?

ब्लू बॉटलचा दंश झाल्यास वेळेवर वैद्यकीय उपचार घेणे आवश्यक आहे. दंश झालेला भाग चोळू नये, दंश झालेल्या भागावर अलगद समुद्राचे पाणी किंवा कोमट पाणी ओतावे. त्वचेत रुतलेले काटे, निळे धागे काळजीपूर्वक काढावे आणि लगेच पुढील उपचाराकरिता जवळच्या रुग्णालयात जावे. योग्य उपचार घेतल्यावर एक ते दोन तासांत वेदना कमी होऊन इजा बरी होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button