
संगमेश्वर तालुक्यातील मेढेतर्फे देवळे येथे आईच्या अंत्यसंस्काराच्या वेळी मुलाचाही दुर्दैवी मृत्यू
आईच्या निधनाचे दुःख असह्य झाल्याने एका मुलाचा तिच्याच अंत्यसंस्कारावेळी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना संगमेश्वर तालुक्यातील मेढेतर्फे देवळे येथे घडली आहे.
अभिजित जयवंत मेढे (वय ४२, रा. मेढेतर्फे देवळे) यांच्या आईचे १६ ऑगस्टला निधन झाले होते. १७ ऑगस्टला सकाळी त्यांच्या आईच्या अंत्यसंस्काराचा कार्यक्रम सुरू असताना, अभिजित यांना अचानक चक्कर आली. नातेवाइकांनी त्यांना तत्काळ साखरपा येथील प्राथमिक आरोग्यकेंद्रात दाखल केले; मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. आईच्या निधनामुळे आलेला मानसिक धक्का आणि ताण यामुळे ही घटना घडली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या दुर्दैवी घटनेमुळे मेढे गावात शोककळा पसरली आहे