राज्यभरातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती!

मुंबई : राज्यभरातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सहकारी साखर कारखाने आणि जिल्हा बँकासह २८५ सहकारी संस्थांच्या निवडणुकांना राज्य सरकारने बुधवारी स्थगिती दिली. राज्यात सध्या ३ हजार १८८ सहकारी संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यात सहकारी बँका, गृहनिर्माण वित्तीय महामंडळ, सूत गिरण्या, बाजार समित्या, गृहनिर्माण संस्था, साखर कारखाने आणि बँकाचा समावेश आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. आतापर्यंत ३० जिल्ह्यांत सरासरीच्या ८० टक्केपेक्षा जास्त पाऊस झाला असून त्यापैकी १५ जिल्हयांत सरासरीच्या १०० टक्के पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. त्यामुळे राज्यातील बहुतेक जिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामातील शेतीविषयक कामात व्यस्त असल्याने ते सभासद असलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे पावसाचा हंगाम पुर्ण होईपर्यंत म्हणजेच ३० सप्टेंबर पर्यंत या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतला आहे.

ज्या सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेतील चिन्ह वाटपाचा टप्पा पूर्ण झाला आहे अशा संस्था, निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली आहे पण पदाधिकाऱ्यांच्या निवडीची प्रक्रिया बाकी आहे अशा संस्था, तसेच ज्या संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबत न्यायालयाचे आदेश आहेत अशा संस्थाना या स्थगिती आदेशातून वगळण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button