
प्रेमिकांचे झालेले भांडण चिपळूण कराड रोडवरील अपघाताला कारणीभूत, निष्पाप लोकांचा नाहक बळी
चिपळूण-कराड मार्गावरील पिंपळी खुर्द येथील वाशिष्ठी दुध डेअरी परिसरात एका भरधाव वेगातील थारने प्रवासी रिक्षाला धडक देऊन झालेल्या भीषण अपघातात पाचजण जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. यातील मृत आसिफ हकिमुद्दीन सैफी (२८, देहारादून-उत्तराखंड) चालवत असलेली थार त्याच्या मैत्रिणीच्या मालकीची असल्याचे पोलीस तपासातून पुढे आले आहे. दरम्यान, मृत आसिफचा मृतदेह मंगळवारी रात्री उशिरा ताब्यात देण्यात आला.
आसिफ सैफी हा त्याच्या मैत्रिणीसोबत पुणे येथे जात असताना चिपळूणमध्ये येताच त्या दोघांमध्ये चालत्या गाडीमध्ये वाद झाला. यावेळी ती गाडीतून मदतीसाठी ओरडत होती. इतकेच नव्हे तर वाद विकोपाला गेल्याने तीने महामार्गावरील शहरातील रावतळे येथे चालत्या कारमधून उडी मारली. पोलिसांनी त्या तरुणीला पोलीस ठाण्यात आणले. बुधवारी ती पोलीस ठाण्यातच होती. चिपळुणात तिचा भाऊ दाखल झाला असून ती तरुणी गोवा येथे शिक्षण घेत असल्याची माहिती पुढे येत आहे.