
बेस्ट पतपेढीच्या तब्बल 15 हजार मतदारांनी ठाकरे बंधू आणि महायुती दोघांनाही नाकारत शशांक राव पॅनेलच्या पारड्यात दान,ठाकरे बंधूंना एकही जागा नाही*
गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र आल्याने मुंबईतील राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चा असलेल्या दी बेस्ट एम्प्लॉईज को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीचा निकाल अखेर समोर आला आहे.18 ऑगस्टला या निवडणुकीसाठी मतदान झाले होते. त्यानंतर मंगळवारी मध्यरात्री या निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत ठाकरे बंधू यांचे उत्कर्ष पॅनेल आणि महायुतीचे सहकार समृद्धी पॅनेल यांच्यात कडवी लढत होईल, असा अंदाज होता. मात्र, सर्वांचा अंदाज चुकवत शशांक राव यांच्या पॅनेलने 14 जागांवर विजय मिळवत सर्वांनाचा आश्चर्याचा धक्का दिला. तर महायुतीच्या सहकार समृद्धी पॅनेलला एकूण सात जागांवर विजय मिळाला. सुरुवातीला सहकार समृद्धी पॅनेलला नऊ जागांवर विजय मिळाला होता. मात्र, मध्यरात्री पुन्हा मतमोजणी झाल्यानंतर शशांक राव पॅनेलच्या आणखी दोन उमेदवारांचा विजय झाला.
गेल्या नऊ वर्षांपासून बेस्ट पतपेढीवर ठाकरे गटाचे एकहाती वर्चस्व होते. मात्र, आता याठिकाणी शशांक राव पॅनेलची सत्ता आली आहे. या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनेलला एकही जागा जिंकता आलेली नाही. ही निवडणूक म्हणजे ठाकरे बंधूंच्या युतीच्यादृष्टीने लिटमस टेस्ट मानली जात होती. मात्र, एकाही जागेवर विजय न मिळवता आल्याने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या चिंता वाढल्या आहेत. शशांक राव यांच्या पॅनेलच्या विजयात गेल्या अनेक वर्षांपासून कामगार संघटनांसोबत काम करण्याचा अनुभव, आंदोलनं आणि बेस्ट कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात वेळोवेळी घेतलेला पुढाकार हे घटक महत्त्वाचे ठरले. या सगळ्यामुळे बेस्ट पतपेढीच्या तब्बल 15 हजार मतदारांनी ठाकरे बंधू आणि महायुती दोघांनाही नाकारत शशांक राव पॅनेलच्या पारड्यात दान टाकल्याची चर्चा आहे. सहकार समृद्धी पॅनेलच्या 7 विजयी उमेदवारांमध्ये भाजपच्या प्रसाद लाड गटाचे 4, शिंदे गटाचे किरण पावसकर गटाचे 2 आणि ओबीसी वेल्फेअर युनियनचा एक उमेदवार विजयी ठरला.
शशांक राव पॅनलचे विजयी उमेदवार – एकूण १४
- आंबेकर मिलिंद शामराव
- आंब्रे संजय तुकाराम
- जाधव प्रकाश प्रताप
- जाधव शिवाजी विठ्ठलराव
- अम्मुंडकर शशिकांत शांताराम
- खरमाटे शिवाजी विश्वनाथ
- भिसे उज्वल मधुकर
8.. धेंडे मधुसूदन विठ्ठल - कोरे नितीन गजानन
- किरात संदीप अशोक
- डोंगरे भाग्यश्री रतन (महिला राखीव)
- धोंगडे प्रभाकर खंडू (अनुसूचित जाती/ जमाती)
13 चांगण किरण रावसाहेब ( भटक्या विमुक्त जाती)
14 शिंदे दत्तात्रय बाबुराव (इतर मागासवर्गीय)
प्रसाद लाड यांच्या पॅनेलचे विजयी उमेदवार – एकूण 7
1 रामचंद्र बागवे
2 संतोष बेंद्रे
3 संतोष चतुर
4 राजेंद्र गोरे
5 विजयकुमार कानडे
6 रोहित केणी (महिला राखीव मतदार संघ)
7 रोहिणी बाईत