दिल्लीच्या CMच्या श्रीमुखात भडकावली, धक्का मारला, केस खेचले; गुजरात कनेक्शन निघालेला आरोपी कोण?

नवी दिल्ली : दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर बुधवारी सकाळी हल्ला झाला. मुख्यमंत्र्‍यांच्या शासकीय निवासस्थानी साप्ताहिक जन सुनावणी सुरु असताना रेखा गुप्ता एका व्यक्तीनं त्यांच्या कानशि‍लात लगावली. आरोपीला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी सुरु आहे. आरोपीनं हल्ला का आणि कशासाठी केला, याची माहिती समोर आली आहे.

दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दर बुधवारी जन सुनावणी होते. आजही सुनावणी सुरु होती. त्यावेळी आरोपीनं राजेश भाई खिमजी भाई सकरियानं मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या श्रीमुखात भडकावली. यानंतर राजेश मुख्यमंत्री गुप्ता यांच्या अंगावर धावून गेला. त्यांना धक्का दिला. मागे भिंत असल्यानं गुप्ता पडता पडता वाचल्या. यावेळी आरोपी राजेशनं त्यांचे केस धरले. यावेळी उपस्थितांनी आरोपीपासून गुप्ता यांची सुटका करण्याचा प्रयत्न केला. लोकांनी आरोपींच्या हातांवर मारण्यास सुरुवात केली. यानंतर त्यानं रेखा गुप्ता यांचे केस सोडले. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जवळपास मिनिटभर हा सगळा प्रकार चालला.

राजेश भाई सकरिया हा ४१ वर्षांचा आहे. तो मूळचा गुजरातच्या राजकोटचा रहिवासी आहे. तो श्वानप्रेमी असल्याचं त्याच्या आईनं सांगितलं. ‘भटक्या कुत्र्यांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालामुळे राजेश दु:खी होता. न्यायालयाच्या निर्णयानंतरच तो दिल्लीला गेला. तो गेल्या अनेक वर्षांपासून शेजारच्या लोकांकडून पोळ्या गोळा करुन कुत्र्यांना खाऊ घालतो. शेजाऱ्यांनादेखील याची कल्पना होती. त्यामुळे ते त्याला आमच्या घरात पोळ्या आणून देतात,’ असं राजेशच्या आईनं सांगितलं.

शेजाऱ्यांनी आणून दिलेल्या पोळ्या राजेश भटक्या कुत्र्यांना, गायींना खाऊ घालायचा. तो पेशानं रिक्षा चालक आहे. पोलिसांनी राजेश सकरियाची आई भानुबेन यांची चौकशी केली. लेकाची मानसिक स्थिती अस्थिर असल्याचा दावा भानुबेन यांनी केला. राजेश याआधीही दिल्लीला गेलेला आहे. पण तो मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाणार याची कल्पना नव्हती, असं भानुबेन म्हणाल्या.

माझ्या लेकाला माफ करा, अशी विनंती राजेशच्या आईनं मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्याकडे केली आहे. माझा लेक महादेवाचा भक्त आहे. तो उज्जैनला जात असल्याचं सांगून घरातून निघाला होता. तो महिन्यातून एकदा उज्जैनला जातो. पण तो उज्जैनहून दिल्लीला कधी गेला, याची आम्हाला काहीच कल्पना नाही, असं भानुबेन यांनी सांगितलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button