
ख्रिस्ती समाजाचा आमदार हरपला! ७२व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेचे माजी सदस्य गिल्बर्ट जॉन मेंडोन्सा यांचे अल्प आजारानंतर सोमवारी ठाण्यात निधन झाले. त्यांचे वय ७२ वर्षे असून मुंबई येथील बॉम्बे रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मेंडोन्सा हे व्यवसायिक कुटुंबातून आले होते. मिरा-भाईंदर शहराचे माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा (७२) यांचे सोमवारी प्रकृती खालावल्यामुळे निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली आणि नातवंडे असा परिवार आहे. १९७८ साली ते मीरा-भाईंदरचे सरपंच म्हणून निवडून आले. पुढे १९९० मध्ये ते मीरा-भाईंदर नगरपरिषदेचे पहिले अध्यक्ष झाले.
दरम्यान, या भागातील वाहतूक सुविधा सुधारण्यासाठी, विशेषतः मीरा रोड रेल्वे स्थानकावरून लोकल गाड्या सुरू करण्याच्या मोहिमेसाठी विशेष प्रयत्न केले होते. त्यानंतर मेंडोन्सा २००९ साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघातून पहिले आमदार म्हणून निवडून आले होते. तर पुढील निवडणुकीत २०१४ साली त्यांचा पराभव झाला होता.
स्थानिक राजकारणात मेंडोन्सा यांनी चार दशकांहून अधिक काळ महत्वपूर्ण भूमिका निभावली असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी मेंडोन्सा यांना श्रद्धांजली वाहिली आहे. गेली दहा वर्षे ख्रिस्ती समाजातून कुठलीही व्यक्ती विधानसभेवर किंवा विधान परिषदेवर निवडून गेलेली नसल्यामुळे महाराष्ट्रातील ख्रिस्ती समाजाचे अखेरचे आमदार असे गिल्बर्ट मेंडोन्सा अशी त्यांची आज ओळख आहे.