
ॲड. राकेश भाटकर यांना कोल्हापूर सर्किट बेंचच्या पहिल्या युक्तिवादाचा मान!
रत्नागिरी : मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर येथील सर्किट बेंचचे उद्घाटन काल भारताचे सरन्यायाधीश मा. न्या. भूषण गवई यांच्या हस्ते संपन्न झाले. आज प्रत्यक्षात कामकाज सुरू झाले. या ऐतिहासिक दिवशी, खंडपीठासमोर नेमण्यात आलेल्या पहिल्याच प्रकरणात युक्तिवाद करण्याचा मान रत्नागिरी जिल्ह्यातील सुप्रसिद्ध ॲडव्होकेट राकेश भाटकर यांना मिळाला.
या दिवशी प्रशासकीय न्यायमूर्ती मा. न्या. मकरंद कर्णिक आणि मा. न्या. शर्मिला देशमुख यांची सर्किट बेंचचे प्रथम खंडपीठ न्यायालय म्हणून नियुक्त करण्यात आले होते. त्यांच्यासमोर ॲड. भाटकर यांचे पहिले प्रकरण पटलावर होते, ज्यात रत्नागिरीतील रहिवासी श्री. जय कदम यांनी कोल्हापूर येथील पोलीस अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली होती.
तक्रारीत त्यांनी आपल्या क्रेनची अनधिकृत विक्री व मुलाला झालेल्या पोलिसी मारहाणीचा उल्लेख केला होता. संबंधित प्रकरणांत कुठलीही गुन्हा न नोंदविण्यात हलगर्जीपणा पोलिसांनी केल्यामुळे, त्यांनी थेट मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
या प्रकरणात महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र शासनाचे महाधिवक्ता ॲड. बिरेंद्र सराफ यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद झाल्यानंतर, न्यायालयाने सरकारला दोन आठवड्यात प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले.
कोल्हापूर सर्किट बेंचमुळे कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर आणि रत्नागिरी या सहा जिल्ह्यांतील नागरिकांना न्याय मिळवणे अधिक सुलभ होणार आहे. अशा ऐतिहासिक दिवशी, पहिल्या क्रमांकाच्या खटल्याचा युक्तिवाद आपल्या जिल्ह्याचे ॲड. राकेश भाटकर यांनी यशस्वीपणे केला याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.