
राजापूर पुरमय ! शहराला पुराच्या पाण्याचा वेढा , जवाहर चौक पाण्याखाली !अणुस्कुरा घाटात दरड कोसळली , पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे प्रशासनाचे आवाहन , दरड हटवण्याचे काम युध्द पातळीवर !
राजापूर / प्रतिनिधी –
गेले आठवडाभर संततधारेने कोसळणाऱ्या पावसाने सोमवारी रात्रीपासुनच जोर धरल्याने मंगळवारी पहाटे राजापूर शहराला पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे . पुराचे पाणी जवाहर चौकातील राधाकृष्ण कोल्ड्रिंक्स पर्यंत पोहोचले असुन जनजीवन विस्कळीत झाले आहे . शीळ कडे जाणारा मार्ग पाण्याखाली गेला असुन शहरातील बहुतांशी भाग पुराच्या पाण्याखाली गेला आहे . तर व्यापाऱ्यानी आपला माल सुरक्षित स्थळी हलवला आहे .
सोमवारी मध्यरात्रीपासुन पावसाचा जोर वाढल्याने अर्जुना नदीच्या पाणी पातळीत वाढ होवुन कोदवली नदीचे पाणी शहर बाजारपेठेत शिरले आहे . शहरातील भटाळी , गुजराळी , वरचीपेठ , चिंचबांध , आंबेवाडी आदी भागातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत . मंगळवारी पहाटे पुराच्या पाण्याचा जोर जास्तच वाढल्याने राजापूर बाजारपेठेतील व्यापाऱ्यानी आपल्या दुकानातील माल सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरुवात केली आहे . शहरातील शिवाजी पथ रस्ता पुर्णत: पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील व्यापाऱ्यानी व रहिवाशानी आपले सामान सुरक्षित स्थळी हलवले आहे .
सकाळी सहा वाजता शहरातील जवाहर चौकात पुराचे पाणी भरल्याने शहरातील संपुर्ण वाहतुक व्यवस्था कोलमडली आहे . हवामान खात्याने मंगळवारी कोकणातील जिल्ह्यांसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केल्याने जिल्हा प्रशासनाने सोमवारी रात्रीच जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयाना सुट्टी जाहीर केली आहे . आजच्या पावसाने तालुक्यातील अनेक भागात पुराचे पाणी शिरल्याने संपुर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे .
मंगळवारी सकाळी साडेसहाच्या दरम्याने अनुस्कुरा घाटात दरड कोसळली असुन घाटमाथ्यावर जाणारी वाहतुक बंद झाली आहे . प्रशासनाने या ठिकाणी तात्काळ यंत्रणा पाठवुन दरड बाजुला करण्याचे काम हाती घेतले आहे .




