
मुसळधार पावसात सुसाट थारची रिक्षाला धडक, कोकणात एकाच कुटुंबातील तिघांसह पाच जणांचा मृत्यू, चिमुरडाही कालवश
रत्नागिरी : मुसळधार पाऊस सुरु असतानाच चिपळूण कराड मार्गावर पिंपळी येथे ट्रक, रिक्षा आणि थार गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये अडीच वर्षीय चिमुरड्याचाही समावेश आहे. सोमवारी रात्री उशिरा दहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
कसा झाला अपघात?
रिक्षा आणि थार एकमेकांना चुकवत असताना समोरुन येणाऱ्या ट्रकला आदळल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. रिक्षा चालक पिंपळी परिसरातील असून लहान मुलासह तिघे जण प्रवास करत होते. या चौघांनाही प्राण गमवावे लागले. याशिवाय ट्रकवर गाडी आदळल्याने थार चालकाचाही जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की थार गाडी आणि रिक्षा यांचा चक्काचूर झाला.
सुसाट थार चालक
हरियाणा राज्यातील पासिंग असलेल्या थार गाडीतून एका मुलीला घेऊन कार चालक सुसाट निघाला होता, असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. याच वेळेला ती मुलगी ‘मला वाचवा’ असं ओरडत असल्याचीही चर्चा आहे. थार चालकाने त्या मुलीला वाटेत सोडलं आणि तो सुसाट निघाला होता. त्याचवेळी हा अपघात झाला. सुदैवाने या दुर्घटनेत ती मुलगी सुखरुप बचावली.
या अपघातात शबाना मियां सय्यद वय 50, हैदर नियाज सय्यद, 3 वर्ष 8 महिने, नियाज हुसेन सय्यद, वय 50, रिक्षा चालक इब्राहिम इस्माईल लोणी, वय 60, या चौघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. हे चारहीजण पिंपळी मोहल्ला येथील आहेत. यामध्ये रिक्षा चालक वगळता कुटुंबातील तिघांचाही समावेश असून आई-वडील व मुलगा या तिघांचाही दुर्दैवीरित्या जागीच मृत्यू झाला आहे. थार गाडी चालकाचे नाव अद्याप समजू शकलेले नाही. त्याची ओळख पाठविण्याच काम पोलिसांकडून सुरू आहे.
या भीषण अपघाताची माहिती मिळताच तात्काळ चिपळूणचे पोलीस उपविभागीय अधिकारी श्री. बेले, पोलीस निरीक्षक श्री. मेंगडे आदी पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाल आहे. रात्री उशिरापर्यंत स्थानिक नागरिक व पोलिसांकडून या ठिकाणी मदतकार्य सुरू होतं. या अपघाताची नोंद चिपळूण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास चिपळूण पोलीस करत आहेत.