
दहा गुंठ्यापर्यंत परवानगीचे अधिकार पुन्हा ’नगर रचना’ खात्याकडे सोपवले, नागरिकांच्यात समाधान
पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्हयातील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या विशेष नियोजन प्राधिकरण असलेल्या प्रभाव क्षेत्रातील १००० चौमीपर्यंत भूखंडाच्या क्षेत्रफळावरील बांधकाम / विकास परवानगीचे अधिकार आता जिल्हास्तरीय नगर रचना शाखा कार्यालयास प्रत्यार्पित करण्यात आले आहेत.
शासनाने सागरी महामार्गाच्या मार्गावरील गावांचा विकास जलदगतीने होण्यासाठी ५९४ गावांसाठी १९ ग्रोथ सेंटरची निर्मिती केली आहे. यामुळे याठिकाणच्या सर्व गावांमधील बांधकाम आणि विकास परवानगीचे सर्व अधिकार थेट महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे गेले आहेत. मात्र, सध्या या महामंडळातर्फे प्रत्येक जिल्हयात आपल्या कार्यालयाची निर्मिती अगर एक खिडकी सुरू करण्याच्या कोणत्याही हालचाली जलदगतीने होण्याची शक्यता कमी असल्याने आणि जनतेचा विरोध लक्षात घेता, शासनाने एक हजार चौरस मीटर म्हणजे किमान दहा गुंठे क्षेत्रात बांधकाम आणि विकास परवानगी देण्याचे अधिकार पुन्हा नगर रचना जिल्हा कार्यालयाकडे वर्ग केले आहेत. यामुळे सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.www.konkantoday.com




