
मंडणगडमध्ये मगरीचे दर्शन; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
मंडणगड : गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कुंभार्ली येथील शिवशंकर मंदिरालगत असलेल्या पुरातन तळ्यातील मोठ्या मगरी रस्त्यावर येऊ लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
या तळ्यात दोन ते तीन मोठ्या तसेच अनेक लहान मगरींचे अस्तित्व असल्याचे स्थानिकांनी सांगितले. सावित्री खाडीला लागून असलेल्या ओढ्यातून या मगरी तळ्यात पोहोचल्या असाव्यात, असा अंदाज वर्तवला जात आहे. सातत्याने कोसळणाऱ्या पावसामुळे तलावातील जलसाठा वाढल्याने मगरी बाहेर आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, रस्त्यावर आलेल्या या मगरी वाहनांच्या प्रकाशाच्या दिशेने येत असल्याने वाहनचालकांमध्येही घबराट पसरली असून, याबाबत प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.