
चिपळूणमधील ३१ कुटुंबांचे स्थलांतर कुटुंबे स्थलांतरित
चिपळूण : तालुक्यातील वशिष्ठी नदी इशारा पातळीवर (५.४६ मी.) आणून, शहरासह तालुक्यात पूर परिस्थिती उद्भवली आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जुवाड बेट येथील २२ कुटुंबातील ५१ लोकांना , कळंबस्ते येथील कुटुंबातील १८ लोकांना, पिंपळी येथील २ कुटुंबातील ७ लोकांना अशा एकूण ३१ कुटुंबातील ७६ लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे.
चिपळूणमध्ये ११ ठिकाणी नगरपालिका, महसूल, पोलीस व NDRF यांची पथके तैनात करण्यात आली असून, ५ ठिकाणी बोटी ठेवण्यात आलेल्या आहेत. काही भागातील पाणी ओसरत असून, सुरक्षेच्या कारणास्तव सखल भागातील विद्युत पुरवठा सुरक्षिततेच्या दृष्टीने बंद करण्यात आलेला आहे. खेर्डी ते हेळवाक वाहतूक सुरू झालेली आहे. हेळवाक येथे रस्त्यावर पाणी साचल्याने हेळवाक-कराड रोड वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. मिरजोळीमध्ये गुहागर रस्त्यावरील पाणी कमी झाल्याने वाहतूक सुरू करण्यात आलेली आहे.
दरम्यान, पूर परिस्थिती लक्षात घेऊन चिपळूणमधील ३१ कुटुंबे स्थलांतरित करण्यात आली आहे. या कुटुंबातील एकूण ७६ नागरिकांना दुसऱ्या घरी तसेच नातेवाईकांकडे स्थलांतरित करण्यात आले आहे. नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.