
गुहागर आगारातून चाकरमान्यांना परतीसाठी १५० गाड्यांचे बुकींग
गणेशोत्सवासाठी गुहागर आगारातून चाकरमान्यांना एसटी महामंडळाची सेवा दिली जात असून आतापर्यंत परतीच्या प्रवासासाठी १५० गाड्यांचे बुकींग झाले आहे. तर येणार्या फेर्या धरून यावर्षी ५०० गाड्यांचे उद्दिष्ट गाठणार असल्याची माहिती गुहागर आगारप्रमुख अशोक चव्हाण यांनी दिली.
मुंबई व पुणे या भागातून तब्बल अडीचशे ते पावणेतीनशे गाड्या गुहागर तालुक्यात येण्याचे नियोजन झाले आहे. तर गुहागर तालुक्यातून परतीच्या प्रवासासाठी आतापर्यंत १५० गाड्यांचे बुकींग झाले आहे. यामध्ये ५० गाड्या ऑनलाईन तर १०० गाड्यांचे ग्रुप बुकींग झाले आहे. २ सप्टेंबरपासून परतीचा प्रवास होणार आहे. यामुळे या गाड्यांच्या संख्येमध्ये अधिकची वाढ होईल. मुंबई, बोरीवली, ठाणे,
नालासोपारा, विठ्ठलवाडी, स्वारगेट, पिंपरी चिंचवड अशा एसटी फेर्या आहेत. नालासोपारा येथील चाकरमान्यांना परतीच्या प्रवासासाठी वाहन मिळावे. याकरीता गुहागर आगारामधील वाहतूक नियंत्रक नालासोपारा डेपोमध्ये पाठविण्यात आले असून त्यांच्या मार्फतही परतीच्या प्रवासासाठी ग्रुप बुकींग घेतले जात आहे. त्याचबरोबर २७ऑगस्टपासून गुहागर आगारातून बोरीवली व पिंपरी चिंचवड अशा दोन जादा एसटी फेर्या वाढविण्यात आल्या आहेत. पिंपरी चिंचवडकरीता शिवशाही वाहतूक करणार आहे. ग्रुप बुकींग व्यतिरिक्त दररोज सकाळी व सायंकाळी मुंबई, भांडूप, नालासोपारा, स्वारगेट, पिंपरी चिंचवड या फेर्या सुरू राहणार आहेत.
गुहागर आगारात दाखल होणार्या वाहनांना गुहागर आगार व पोलीस परेड मैदानावर पार्कगिंची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच राष्ट्रीय महामार्गावरील साईटपट्टी खोदाई केली गेली असल्याने शृंगारतळी येथे पार्किंगसाठी खासगी जागा घेतली जाणार आहे. येणार्या चालकं-वाहकांची शहरातील भंडारी भवन सभागृहात राहण्याची व्यवस्था केली जात असून याबाबत संबंधित सभागृह चालकांजवळ बोलणे सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. गुहागर आगारात केवळ ६४ एसटी गाड्या असून नियमितच्या फेर्या कायम ठेवून बाहेरून येणार्या गाडयांच्या माध्यमातून चाकरमन्यांना परतीची सेवा दिली जाणार आहे.www.konkantoday.com