
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गावर सुरक्षित प्रवासासाठी महामार्ग वाहतूक विभाग सज्ज
गणेशोत्सव कालावधीमध्ये कोकणात येणार्या भाविकांना कोणत्याही प्रकारे त्रास न होता त्यांनी त्यांचा गणेशोत्सव सण साजरा करण्यासाठी आपापल्या घरी सुखरूप जावेत यासाठी महामार्ग सुरक्षा पोलीस सज्ज राहणार आहेत. यावर्षी शून्य अपघात व सुरक्षित महामार्ग ठेवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे महामार्ग वाहतूक विभागाचे अपर पोलीस महासंचालक प्रवीणकुमार साळुंखे यांनी सांगितले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गावर प्रवाशांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी निर्माण होऊ नये यासाठी साळुंखे यांनी रस्ते पाहणी दौरा केला. यावेळी रायगड परिक्षेत्र महामार्ग पोलीस अधीक्षक तानाजी चिखले, पनवेल विभाग पोलीस पोलीस निरीक्षक भरत शेंडगे, रायगड निरीक्षक विनोद माळवे, रत्नागिरी निरीक्षक दीपाली जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक राणी पाटील, पोलीस उपनिरीक्षक अनंत पवार उपस्थित होते. यावेळी वाकण, महाड, कशेडी या तिन्ही मदत केंद्रांवर पोलीस निरीक्षक विनोद माळवे, चिपळूण, हातखंबा, कसाल येथे पोलीस निरीक्षक दीपाली जाधव प्रभारी अधिकारी आहेत. त्यांनी प्रत्येक मदत केंद्रांमध्ये असणारे कर्मचारी अधिकारी यांच्यासोबत आढावा घेऊन तेथे त्यांच्या अडचणींबाबत चर्चा केली. तसेच कर्तव्य बजावताना कोणकोणत्या बाबींवर काय-काय अडचणी आणि उपाययोजना करता येतील, याबाबत चर्चा केली.
www.konkantoday.com