
उक्षी रेल्वेस्टेशनला जोडणारा रस्ता डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत
तालुक्यातील उक्षी रेल्वेस्टेशनला जोडणारा रस्ता गेली अनेक वर्षे डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. १९९५ ते २०२५ या कालावधीत विविध पक्षांची सरकार येऊनही या रस्त्याकडे दुर्लक्षच झाले आहे. याबाबत परिसरातील ग्रामस्थांनी वेळोवेळी मागणी करुनही संबंधितांचे दुर्लक्ष झाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
रेल्वेस्टेशन ते वांद्री-उक्षीपूल हे अंतर अवघे अडीच कि.मी.चे आहे. रस्ता गाडी चालविण्यायोग्य नसल्यामुळे वांद्री, तळेकांटे, करबुडे, रानपाट, लाजूळ, आंबेड या परिसरातील लोकांना उक्षी, पोचरी, देन, फुणगूस, परचुरी असा १३ ते १४ कि.मी.चा प्रवास करावा लागतो. तसेच येथील रिक्षाचालकांच्या व्यवसायावर परिणाम होत आहे.
उक्षी रेल्वेस्टेशन हे दुर्गम भागात वसलेले असून दोन-अडीच कि.मी. वर असलेला मुंबई-गोवा महामार्ग जोडणं ही काळाची गरज असल्याचे मतही व्यक्त होत आहे. या रस्त्यासाठी परिसरातील शेतकर्यांनी आपल्या जमिनी, कलम, आंबा, फणस, काजू यासारख्या. बाबी विनामोबदला दिल्या. हा रस्ता फक्त रेल्वेस्टेशनलाच जोडणारा नसून येथील मुस्लीम मोहल्ला, बौद्धवाडी, चर्मकारवाडी, भेळीवाडी, चिंचपारवाडी अशा छोट्या-मोठ्या वाड्यांनाही जोडला गेला आहे. पर्यटकांना भुरळ घालणारे नैसर्गिक सौंदर्य या परिसराचे असून रस्त्याअभावी उपेक्षित आहे. खाडीपट्ट्यातील गावांच्या सर्वांगीण विकासासाठी हा रस्ता अत्यंत महत्वाचा असून संबंधितांनी याकडे तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी येथील ग्रामस्थांतून करण्यात येत आहे.www.konkantoday.com