
९० व्या वर्षानंतर अण्णा हजारेंनी हे करतच राहावे आणि तुम्ही झोपून राहावे अशी कुणाची अपेक्षा असेल तर हे चुकीचे आहे- अण्णा हजारे
राज्यात सध्या मतदार यादीतील घोळ आणि निवडणूक आयोगावर विरोधकांकडून गंभीर आरोप होत आहेत. यातच पुण्यात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा उल्लेख करून एक बॅनर झळकला, त्यात अण्णा, आता तरी उठा अशा आशयाचे मजकूर लिहून त्यांच्यावर पुणेरी शैलीत टीका करण्यात आली होती.या बॅनरवर अण्णा हजारे यांनी मौन सोडले आहे. हे माझे दुर्दैव आहे अशी खंत अण्णा हजारे यांनी व्यक्त केली.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे म्हणाले की, भ्रष्टाचार होऊ नये, भ्रष्टाचाराला आळा बसावा यासाठी मी १० कायदे केले. माहितीचा अधिकार देशाला मिळाला. यातून किती जागृती दिली. दफ्तर दिरंगाई, बदलीचा कायदा, लोकपाल, लोकायुक्त यासारखे १० कायदे आणले. आता ९० व्या वर्षानंतर अण्णा हजारेंनी हे करतच राहावे आणि तुम्ही झोपून राहावे अशी कुणाची अपेक्षा असेल तर हे चुकीचे आहे. अण्णा हजारे यांनी मागच्या काळात जे केले ते तरूणांनी केले पाहिजे असं वाटायला हवे. आपले कर्तव्य आहे की नाही..? असा सवाल त्यांनी विचारला.
तसेच नुकताच आपण स्वातंत्र्यदिन साजरा केला. मी देशाचा नागरीक आहे. नुसते हातात तिरंगा घेऊन काही होणार नाही. या देशासाठी ज्यांनी बलिदान केले त्यांची आठवण ठेवली पाहिजे. फक्त दुसऱ्यांवर बोट दाखवून त्यातून बदल होणार नाही. तरुणांनी जागे झाले पाहिजे. मी मोठ्या आशेने तरुणांकडे पाहत आहे. युवाशक्ती ही राष्ट्रशक्ती आहे. ही तरूणाई जागी झाली तर उद्याचं भविष्य दूर नाही असं मला वाटते. म्हणून कायदे करून तरूणांच्या हातात दिले आहेत. आता एवढी वर्ष झाली, आजही अण्णा हजारे यांनी जागे व्हावे हे ऐकल्यानंतर वाईट वाटते अशी खंत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी व्यक्त केली.