
सुंदरवाडी दहीहंडी’ महोत्सवाला सावंतवाडीकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला. पालकमंत्री नितेश राणे यांच्यासह ‘सैराट’ फेम अभिनेत्री रिंकू राजगुरूचीही उपस्थिती
भाजपा युवा नेते संदीप गावडे यांच्या पुढाकाराने आयोजित ‘सुंदरवाडी दहीहंडी’ महोत्सवाला सावंतवाडीकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला. पालकमंत्री नितेश राणे यांच्यासह ‘सैराट’ फेम अभिनेत्री रिंकू राजगुरूनेही उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.रिंकू राजगुरूने तिच्या खास शैलीत ‘काय सावंतवाडीकर काय बरा मा’ आणि ‘मराठीत सांगलेला कळत नाय, मालवणीत सांगू?’ असे संवाद मालवणीत म्हणून उपस्थितांची मने जिंकली. तिला पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती.
पालकमंत्री नितेश राणे यांनी सावंतवाडीकरांच्या उत्साहाचे कौतुक केले. रात्री उशिरापर्यंत मुंबई-ठाण्याबाहेर एवढ्या मोठ्या संख्येने लोक पहिल्यांदाच पाहिले, असे म्हणत त्यांनी सावंतवाडीकरांनी आपल्याला थक्क केल्याचे सांगितले. तसेच, संदीप गावडे यांच्या माध्यमातून सुरू असलेले संघटनात्मक काम कौतुकास्पद असून, त्यांना भविष्यात यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल कवयित्री कल्पना बांदेकर, युवा उद्योजक भार्गव धारणकर, मिहीर मठकर, पोलिस हवालदार अमित राऊळ, मालवणी कवी दादा मडकईकर, डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर आदींचा सत्कार करण्यात आला. दहीहंडी उत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल आयोजक संदीप गावडे यांनी चाहत्यांचे तोंडभरून कौतुक केले दरवर्षी अशा प्रकारची विविध उपक्रम राबवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू (आर्ची) यांनी सुंदरवाडी दहीहंडी उत्सवात सहभागी होत सर्वांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी आयोजकांचे, विशेषतः ‘संदीप गावडे’चे आभार मानले. सावंतवाडीत येऊन त्यांना खूप छान वाटले. येथील माणसे आपली वाटतात आणि लगेच एक जिव्हाळ्याचे नाते जोडले जाते, असे त्यांनी सांगितले. आपल्या माणसांसोबत दहीहंडी साजरी करण्याचा आनंद आणखीनच मोठा असल्याचेही त्या म्हणाल्या. यावेळी युवकांनी झिंगाट गाण्यावर ताल धरला.