
श्रीराम संस्कार केंद्राच्या मुलांच्या सादरीकरणाने उपस्थितांची जिंकली मने
कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्र आणि संस्कृतभारती रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने येथे दि. ७ ऑगस्ट २०२५ रोजी संस्कृत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाप्रसंगी विविध कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. यात रत्नागिरी शहरातील श्रीरामनगर येथील श्रीराम संस्कार वर्गाच्या चमूने सादरीकरण केले. लहान मुलांमध्ये संस्कृत व संस्कृतीची रुजवण व्हावी यासाठी श्रीराम संस्कारवर्ग नाचणे येथे कार्यरत आहे. यालाच अनुसरून या संस्कार केंद्रातील विद्यार्थ्यांनी आपल्या सादरीकरणातून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
श्रीराम संस्कार वर्ग नाचणे येथील संस्कार वर्गातील मुलांनी गणितम् ही लघुनाटिका अन्वेष कौठणकर व अदिती गद्रे यांनी सादर केली. तसेच स्वरांजली हेगडे, वीरा हेगडे, सर्वेश मराठे यांनी हस्ती हस्ती हे अभिनयगीत सादर केले.
गार्गी शिंदे आणि सिद्धांत मराठे यांनी माता चिंताक्रांता या विषयावर लघुनाटिका सादर केली.
संस्कार वर्गाच्या सर्व मुलांनी मिळून जयति जयति भारतमाता हे गीत सादर केले. या सर्व सादरीकरणाचे नियोजन श्रीराम संस्कार वर्गाच्या प्रमुख शिक्षिका सौ. रश्मी मराठे यांनी केले होते.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून रत्नागिरीतील आयुर्वेदाचार्य डॉ. प्रसन्न मुळ्ये , रत्नागिरी उपकेंद्राचे संचालक व संस्कृत भारतीचे जिल्हाध्यक्ष डॉ दिनकर मराठे संस्कृतभारतीच्या कोकण प्रांत अध्यक्षा डॉ. कल्पना आठल्ये, दक्षिण रत्नागिरी जिल्ह्याच्या मंत्री अक्षया भागवत, नागरिक, रत्नागिरी उपकेंद्रातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थी उपस्थित होते.