
वीजवाहिनीकडे योग्य नियोजनाअभावी लक्ष दिले गेले नसल्याने संगमेश्वर तालुका २१ तास अंधारात
संगमेश्वर तालुक्यात रविवारी संध्याकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास खंडित झालेला वीजपुरवठा सलग २१ तास बंद होता. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी आणि या कामाचे याचे योग्य नियोजन करण्यासाठी महावितरणचे अभियंता संगमेश्वर येथे उपस्थित नसल्याने पूर्ण तालुक्याचा विजापुरवठा सलग २१ तास खंडित होता. अखेर आज सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास वीज पुरवठा सुरळीत झाला. दरम्यान, याबाबत संगमेश्वर तालुका वासियांनी महावितरण विरोधात तीव्र शब्दात आपली नाराजी व्यक्त करून या घटनेची अधीक्षक अभियंत्यांनी सखोल चौकशी करावी अशी मागणी केली आहे.
रविवारी सकाळी ११ वाजता संगमेश्वर तालुक्याला वीजपुरवठा करणारी निवळी – संगमेश्वर ही ३३ केव्ही क्षमतेची वीज वाहिनी नादुरुस्त झाली. यानंतर ही वीज वाहिनी तत्काळ दुरुस्त करण्यासाठी कोणतीही हालचाल केली गेली नाही. दिवसभरात या वीजवाहिनीकडे योग्य नियोजनाअभावी लक्ष दिले गेले नसल्याने निवळी संगमेश्वर वीजपुरवठा सुरू होऊ शकला नाही. रविवारी रात्री ७.३० वाजण्याच्या सुमारास आरवली ते संगमेश्वर ही ३३ केव्ही क्षमतेची दुसरी वीज वाहिनी नादुरुस्त झाली. दोन्ही बाजूने संगमेश्वर तालुक्याला होणारा वीजपुरवठा खंडित झाला. महावितरणचे कर्मचारी संगमेश्वर आरवली या ३३ केव्ही विज वाहिनीवर दुरुस्तीचे काम करण्यासाठी रवाना झाले होते; मात्र मुसळधार पाऊस, रात्रीची वेळ आणि जंगल भागातून गेलेली वीज वाहिनी यामुळे आरवली संगमेश्वर ही ३३ केव्ही क्षमतेची वीज वाहिनी दुरुस्त होऊ शकली नाही, असे महावितरणतर्फे सांगण्यात आले.
अन्यवेळी वीजपुरवठा खंडित होणार असेल तर महावितरण भ्रमणध्वनीवर संदेश पाठवून ग्राहकांना कल्पना देते. रविवारी खंडित झालेल्या वीज पुरवठ्याबाबत मात्र महावितरणने कोणत्याही प्रकारचे संदेश पाठवले नाहीत अथवा पत्रक काढून सोशल मीडियाद्वारे कोणतीही माहिती दिली नाही. म्हणून संगमेश्वर तालुक्यातील ग्राहकांनी महावितरणच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला. गणेशोत्सव आठवडाभरावर येऊन ठेपला आहे. अशा स्थितीत गणेश मूर्ती कारखान्यात मोठी लगबग सुरू आहे; मात्र सलग २१ तास वीज पुरवठा खंडित राहिल्याने गणेश मूर्ती कारखानदारांनी देखील महावितरण विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
आरवली ते संगमेश्वर या ३३ केव्ही क्षमतेच्या वीजवाहिनीवर रविवारी रात्री थांबवलेले दुरुस्तीचे काम करण्यासाठी सोमवारी सकाळी महावितरणचे कर्मचारी रवाना झाले. रात्रभर खंडित असलेला संगमेश्वर तालुक्याचा विजपुरवठा सकाळी १० वाजेपर्यंत सुरू होईल अशी अपेक्षा होती; मात्र प्रत्यक्ष वीजपुरवठा सुरू होण्यास संध्याकाळी ४:३० वाजून गेले. योग्य नियोजनाअभावीच संपूर्ण संगमेश्वर तालुक्याला एकवीस तासांपेक्षा अधिक काळ वीज पुरवठ्यापासून खंडित राहावे लागले, असा आरोप ग्राहकांनी केला आहे.
गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना महावितरणकडून सलग २१ तास वीज पुरवठा खंडित राहतो; मग ऐन गणेशोत्सवात चांगल्या सेवेची हमी कशी मिळेल? असा सवाल ग्राहकांनी उपस्थित केला असून या घटनेकडे लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने पाहिले नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. महावितरणने संगमेश्वर तालुकावासीयांच्या भावनांचा अंत पाहू नये, असे संगमेश्वर येथील सामाजिक कार्यकर्ते विनोद म्हस्के यांनी म्हटले आहे.
संगमेश्वर येथील एक कनिष्ठ अभियंता दर शुक्रवारी सांगलीला आपल्या गावी निघून जातात. गावाहून हे अभियंता सोमवारी कार्यालयात उपस्थित होतात. ज्यांच्याकडे उपअभियंता म्हणून जबाबदारी आहे, ते संगमेश्वर येथे न राहता देवरुख येथे वास्तव्याला असतात. रविवारी संगमेश्वर – निवळी आणि संगमेश्वर आरवली या दोन्ही मुख्य वीज वाहिनी नादुरुस्त झाल्या तेव्हा संगमेश्वर येथील दोन्ही अधिकारी आपल्या कर्तव्यावर उपस्थित नसल्याची गंभीर माहिती पुढे आली आहे. लोकप्रतिनिधींसह रत्नागिरी येथील महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांनी दीर्घकाळ खंडित राहिलेल्या संगमेश्वर येथील वीज पुरवठ्या बाबत सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.