
विजयदुर्ग बंदर रो रो सेवेसाठी सज्ज
विकासाच्या दूरदृष्टीने विचार करणाऱ्या ना.नितेश राणे यांनी माझगाव डॉक ते विजयदुर्ग बंदरापर्यंत रो-रो कार वाहतुक करणारी बोट सेवा सुरू करण्याचा महत्वाकांक्षी आणि कोकणच्या बंदर विकासाला चालना देण्याचा प्रयत्न चालविला आहे. मुंबई ते विजयदुर्ग हा प्रवास पाच तासांमध्ये अपेक्षित आहे. विजयदुर्ग बंदरामध्ये रो-रो कार वाहतुक करणारी बोट वाहतुक सुरू होत आहे. कोकणात मोठ्याप्रमाणावर साजरा होणाऱ्या गणेशात्सवकाळात मुंबई ते सिंधुदुर्ग हा कोकण प्रवासाचा जलमार्गाचा प्रवास सुरू होत असल्याने साहजिकच विजयदुर्ग बंदराला यानिमित्ताने निश्चितच ऐश्वर्य प्राप्त होईल. विजयदुर्ग बंदरामध्ये सुरू होणाऱ्या या रो-रो कारसेवेने कोकणात येण्याचा एक नवा जलमार्ग तयार झाला आहे. कोकणात प्रवासी बोट वाहतुक बंद झाल्यानंतर कोकणातील बंदरांना आलेली अवकळा यानिमित्ताने दूर होण्यास निश्चितच मदत होणार आहे. भविष्यात विजयदुर्ग बंदराला पुन्हा उर्जितावस्था आणण्यासाठी अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प प्रस्तावित आहे. यामध्ये महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाच्या सहकार्याने उभारल्या जाणाऱ्या ‘ग्रीनफिल्ड’ पोर्टच्या आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट(जेएनपीटी) च्या सॅटेलाईट पोर्टच्या योजनांचा समावेश आहे. मात्र, या सर्व योजनांना आवश्यक असलेल्या महत्वाच्या पायाभूत सुविधा निर्माण कराव्या लागणार आहेत. निश्चितच त्यासाठीही मत्स्यद्योग व बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे प्रयत्न करतीलच. प्रस्तावित असणारा कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्ग जर तयार झाला तर कोकणातील सुरक्षित असणाऱ्या विजयदुर्ग बंदरामध्ये मालवाहतुकही शक्य होऊ शकेल.




