
राज्यात धुवांधार पाऊस; जनजीवन विस्कळीत; मुंबईतही तुफान पाऊस; ठाण्यात दोन दिवस शाळांना सुट्टी जाहीर
मुंबई – राज्यातील बहुतांश जिल्ह्यात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून शेती पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मुंबईत पुढील दोन दिवसात मोठा पाऊस होण्याची शक्यता असून नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेडमध्ये एका शेतकऱ्याच्या गोठ्यात पूराचे पाणी आल्याने चक्क 50 म्हशी दगावल्याची दुर्घटना घडली.
मराठवाडा, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रातही नद्या-नाले भरुन वाहत आहेत. दुसरीकडे कोकणसह मुंबईतही धुव्वादार पाऊस सुरू असून रस्त्यांना नद्याचं स्वरुप आल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबई, उपनगर, ठाणे आणि नवी मुंबईतही पावसाचा जोर सकाळपासूनच आहे. ठाण्यात अवघ्या 4 तासात 31.22 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. ठाण्यात 18 आणि 19 ऑगस्ट रोजी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलीय. तर, नवी मुंबईतही शाळेला सुट्टी देण्यात आली आहे.
इतके दिवस विश्रांती घेतलेला पाऊस अचानक आला, मात्र मागच्या 24 तासात असं काय घडलं ज्यामुळे पावसाचा जोर वाढला. अचानक ढगफुटीसदृश्य पाऊस येण्यामागे नेमकं काय कारण आहे याबाबतची माहिती मुंबई प्रादेशिक हवामान केंद्रातील हवामान तज्ज्ञ शुभांगी भुते यांनी दिली आहे. अशा प्रकारे पडणारा पाऊस किती दिवस राहणार त्याचा धोका किती आहे याचे अपडेट देखील त्यांनी दिले आहेत. शुभांगी भुते यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळपासून सतत धो- धो पाऊस सुरू आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे. त्याच सोबत ईस्ट वेस्ट शेअर झोन तयार झाला आहे. सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झालं आहे. संयुक्त प्रभाव म्हणून मुंबईसह कोकण आणि राज्यातील काही जिल्ह्यांत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस सुरू आहे. पहाटेपासून पावसाने जोर धरला आहे.