
रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकर्यांची ‘फार्मर आयडी’कडे पाठ
केंद्र व राज्य शासनाच्या कृषी योजनांचा लाभ थेट शेतकर्यांना मिळावा, यासाठी शेतकरी ओळख क्रमांक अर्थात फार्मर आयडी बंधनकारक करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात एकूण 4 लाख 87 हजार 936 इतके खातेदार असून आतापर्यंत 2 लाख 30 हजार शेतकर्यांनी फार्मर आयडी काढली आहे, तर 2 लाख 58 हजार 154 शेतकर्यांनी फार्मर आयडी अद्याप काढलेली नाही.त्यामुळे गणेशोत्सवात येणार्या चाकरमान्यांनी याकडे लक्ष देवून फार्मरआयडी काढून घ्यावी, अन्यथा पीक विम्यासह विविध लाभ शेतकर्यांना मिळणार नाही.
शेतकरी ओळख तयार करण्यासाठी शासनाचा हा महत्त्वकांक्षी उपक्रम आहे. शेतकर्यांना विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकर्याला वारंवार प्रमाणिकरणांची आवश्यकता राहणार नाही. अॅग्रीस्टॅक योजनेअंतर्गत शेतकर्याने आपला सातबारा आधार लिंक करायचा आहे. जेणेकरून तुम्हांला एक फार्मर आयडी मिळणार आहे. ज्या शेतकर्यांकडे फार्मर आयडी नाहीत त्यांना पीक विमा, पीक कर्ज, पीएम किसान व पीक अनुदान याचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर शेतकर्यांनी फार्मर आयडी काढावी व शासनाच्या विविध योजनेचा लाभ घ्यावा, असे आवहन करण्यात आले आहे.




