
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे रत्नागिरी पालिके विरोधात भिक मांगो आंदोलन
रत्नागिरी नगरपालिकेला आर्थिक चणचण असल्यामुळे पालिकेने कामगार कपात केली आहे, खड्ड्यांचा प्रश्न तसाच असून, ऐन सणासुदीच्या कालावधीतही पालिका प्रशासनाचा कारभार ढिम्म आहे. याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने (मनसे) उद्या जयस्तंभ येथे उद्या (१९ ऑगस्ट) भिक मांगो आंदोलन केले जाणार आहे. भीक मागून गोळा होणारा पैसा नगरपालिकेला आर्थिक सहाय्य म्हणून दिला जाणार आहे.
मनसेचे जिल्हाध्यक्ष (दक्षिण) अविनाश सौंदळकर यांच्या आदेशानुसार सकाळी ११ वाजता रत्नागिरी नगर परिषद विरोधात भिक मांगो आंदोलन केले जाणार आहे. आर्थिक कारण पुढे करत तब्बल ५५ कंत्राटी कामगारांना पालिकेने कमी केले आहे. तसेच पावसामुळे रस्त्यावरचे डांबर निघाले असून, पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत आणि इतरत्र पसरत आहे. यामुळे रस्ता खड्डेमय झाला असून, रस्त्यावरील निघालेल्या खडीमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिक तसेच वाहन चालक वाहन हैराण झाले असून, याच्या अनेक तक्रारी मनसेकडे प्राप्त झाल्या आहेत.
नागरिकांच्या समस्यांची गांभीर्याने दखल घेऊन मनसेतर्फे भिक मागून पालिकेला आर्थिक सहाय्य केले जाणार आहे. त्यासाठी समस्त रत्नागिरीकरांनी जयस्तंभ येथे मोठ्या संख्येने एकत्रित जमावे आणि पालिकेला जाब विचारावा, असे आवाहन मनसेतर्फे करण्यात आले आहे.




