
उरणला जोडणाऱ्या मार्गाच्या सर्व जलसेवा बंद, मुसळधार आणि धोक्याच्या इशाऱ्यामुळे सेवा स्थगित!
उरण : वादळी वारे व हवामान विभागाने दिलेल्या खराब वातावरणाच्या धोक्याच्या इशाऱ्यानंतर उरणला जोडणाऱ्या सर्व जलमार्ग सेवा बंद करण्यात आली आहे. सोमवार असल्याने जलमार्गाने प्रवास करणाऱ्या चाकरमानी,व्यवसायीक आणि विद्यार्थ्यांना याचा फटका बसला आहे. यात मोरा -मुंबई,गेट वे ते एलिफंटा लेणी, जेएनपीए ते मुंबई, करंजा ते रेवस या प्रमुख जलसेवा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे समुद्रात धोक्याचा इशारा देणारा बावटा लावण्यात आला आहे. त्यामुळे उरणच्या मोरा ते मुंबई दरम्यानची जलसेवा तात्पुरत्या स्वरूपासाठी बंद करण्यात आली आहे.
वादळी वाऱ्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव ही प्रवासी सेवा बंद करण्यात आली आहे. विश्रांती घेतलेल्या पावसाने शुक्रवार पासून पुन्हा एकदा वादळी वारे आणि पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे प्रति तास ४० ते ५० या वेगाने वादळी वारे वाहू लागले आहेत. यामुळे जलवाहतूक धोकादायक बनली आहे. हवामान विभागाने धोक्याचा इशारा देणारा बावटा लावला आहे. उरणच्या मोरा ते मुंबईत दरम्यानची सेवा असून अवघ्या अर्ध्या ते एक तासात या मार्गाने पोहचता येते. हे जलसेवा पावसाळ्यात ही सुरू असते. त्यामुळे उरण मधील चाकरमानी, व्यवसायीक आणि सर्वसामान्य प्रवासी ही याच मार्गाचा वापर करीत होते. त्यात पावसाळ्यात मोरा मुंबई या जलमार्गावरील प्रवासाच्या तिकीटाचे दर वाढविण्यात येते. त्याचप्रमाणे वादळी वाऱ्यामुळे या मार्गाने प्रवास करणे धोकादायक असल्याने प्रवासी पर्यायी मार्गाने प्रवास करीत आहेत. मात्र या सर्वांचा मेरिटाईम बोर्डाच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या बोट व्यवसायावर परिणाम झाला आहे.
खवळलेला समुद्र, खराब हवामानामुळे विविध बंदरांत धोक्याचा इशारा देणारा तीन नंबरचा बावटा लावण्यात आला आहे. त्यामुळे शनिवारी दुपारपासून गेट वे-एलिफंटा, गेट वे-जेएनपीए, मोरा-भाऊचा धक्का, करंजा-रेवस या मार्गावरील सागरी प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली आहे. बोटी बंद असल्याने प्रवासी व कामगारांना रेल्वे, एसटी, बस, खासगी वाहनाने कामाचे ठिकाण गाठण्याची वेळ आली आहे. तसेच मासेमारी बोटही बंदरात माघारी परतल्याने मासेमारीही ठप्प झाली आहे. दोन महिन्यात सहाव्यांदा लाँच सेवा कोलमडल्याने संताप व्यक्त होत आहे.
खराब हवामान आणि मुसळधार पावसाचा फटका सागरी प्रवासी वाहतुकीला बसला आहे. त्यातच बंदरात धोक्याचा इशारा देणारा तीन नंबरचा बावटा शनिवारी विविध बंदरांत लावण्यात आला. त्यामुळे खबरदारी म्हणून गेट वे ऑफ इंडिया-एलिफंटा, गेट वे-जेएनपीए दरम्यानची सागरी प्रवासी वाहतूक सलग सहा दिवस बंद करण्यात आली असल्याची माहिती गेट वे मुंबई जलवाहतूक संस्थेचे सेक्रेटरी इक्बाल मुकादम यांनी दिली. धोक्याच्या इशाऱ्यानंतर या सागरी मार्गावरील प्रवासी, पर्यटक वाहतूक पूर्णपणे कोलमडून गेली आहे. विविध सागरी मार्गांवरील पर्यटक, प्रवासी सेवा खंडित झाल्याने या सागरी मार्गावरून दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवासी, पर्यटकांची गैरसोय होत आहे.
खवळलेल्या समुद्रात जाऊ नका !
खराब हवामानामुळे स्थानिक मासेमारीवरही बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक मासळी बाजारात मासळीचा तुटवडा निर्माण झाला आहे. दरम्यान ताशी ५०-६० किमी वाऱ्यासह समुद्रात खवळलेली स्थिती राहणार असून मच्छीमारांनी या कालावधीत समुद्रात जाऊ नये, असे आवाहन मोरा बंदर विभागाकडून करण्यात आले आहे. हजारो प्रवासी पर्यटकांना धोक्याचा इशारा देणारा लाल बावटा उतरून पूर्ववत सुरू होण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हवामान विभागाने धोक्याचा इशारा जाहिर केला आहे. त्यामुळे मोरा ते मुंबई जलसेवा बंद करण्यात आली आहे. हा इशारा संपल्या नंतर ही सेवा पूर्ववत सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मोरा बंदर अधिकारी नितीन कोळी यांनी दिली आहे.