
सध्या कोकणात जाण्याचा विमान प्रवास हा थायलंड, सिंगापूर किंवा दुबईला जाण्यापेक्षाही महाग
कोकणातल्या चाकरमान्यांना गणेशोत्सवाची चाहूल लागली आहे. मुंबई-ठाण्यातील गणेशभक्तांचा बाप्पाच्या दर्शनासाठी कोकणाकडे होणारा वार्षिक महाप्रवास काही नवीन नाही, पण दरवर्षीप्रमाणे यंदाही वाहतुकीचा गोंधळ हा सर्वात मोठा अडथळा ठरणार का, हा प्रश्न उभा आहे.यावर्षीही परिस्थिती फारशी वेगळी नसेल, कारण मुंबई-गोवा महामार्गावर अद्याप खड्ड्यांची चाळणच आहे. त्यामुळे वाहन प्रवासाला अतिरिक्त वेळ लागणार हे निश्चित. अशा वेळी कोकणात बाप्पाच्या उत्सवासाठी निघालेल्या चाकरमान्यांचा अधिकांश वेळ हा प्रवासातच खर्च होणार आहे. परिणामी, यंदा गणपतीसाठी कोकणात कसे जायचे हा प्रश्न अनेकांसमोर उभा राहिला आहे.वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि वेळ वाचवण्यासाठी अनेकजण विमान प्रवासाला प्राधान्य देतात. विमानाने मुंबईहून गोवापर्यंत किंवा कोकणातील इतर विमानतळांपर्यंत काही तासांत पोहोचता येते, हीच आशा ठेवून तिकीट बुक केले जाते. मात्र, यंदा विमान प्रवासाचे दर चाकरमान्यांच्या बजेटला चांगलेच झळकावणारे ठरत आहेत.सध्या कोकणात जाण्याचा विमान प्रवास हा थायलंड, सिंगापूर किंवा दुबईला जाण्यापेक्षाही महाग झाला आहे. दुबईला जाण्यासाठी सर्वात स्वस्त विमानाचे तिकीट १३ हजार रुपयांच्या आसपास आहे.
स्पाईस जेटचे तिकीट १६ हजार, तर एअर इंडियाचे तिकीट १८ हजारांहून अधिक आहे. पण, २६ ऑगस्ट रोजी म्हणजेच गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी स्पाईस जेटच्या मुंबई-गोवा विमानाचे तिकीट तब्बल २१ हजार रुपयांवर पोहोचले आहे. तर काही तिकीटं ही 4 हजार, 7 हजार किंवा 10 हजारांदरम्यानही खरेदी करता येणार आहेत.ऐरवी ३ हजार रुपयांच्या आसपास असलेले हेच तिकीट आता सात पटीने वाढून मिळत आहे. परिणामी, कोकणात बाप्पाच्या भेटीसाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना यंदा केवळ प्रवासासाठीच अव्वाच्या सव्वा पैसे मोजावे लागणार आहेत.




