
कोणी कुठेही जावो, काळच ताकद दाखवेल, पालकमंत्री उदय सामंत यांचा मंत्री नितेश राणे यांना टोला
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव दि.१९ ऑगस्टला भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे मंत्री नितेश राणे यांनी जाहीर केल्यानंतर शुक्रवारी पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी आपले परखड मत व्यक्त केले. कोणी कोणत्या पक्षात जावे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. प्रशांत यादव कुठेही गेले त्याचे उत्तर काळ ठरवेल. कोणाची किती ताकद आहे, हे येणार्या काळात दिसेल असेही ना. उदय सामंत यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
स्वातंत्र्य दिनाचा ध्वजारोहण सोहळा झाल्यानंतर पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. मंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजन निधी वाटपात पालकमंत्री दुजाभाव करत आहेत. मीही सिंधुदुर्गचा पालकमंत्री आहे, तेथेही याचे पडसाद उमटतील, असा इशारा दिला होता. त्यावर ना. सामंत यांनी बोलणे टाळले. परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून लढवल्या जातील.
निवडणुकीसंदर्भात अंतिम निर्णय घेण्यासाठी तिन्ही पक्षांची समन्वय समिती आहे. त्या समन्वय समितीमध्ये मी स्वतः आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण यांच्याशी रत्नागिरी जिल्ह्यासंदर्भात आपली दोन तास चर्चा झाली आहे. मागील टर्ममध्ये जिल्हा परिषदेत क्षाजपचा एकही सदस्य नव्हता. आ. चव्हाण यांना याची माहिती आहे. कार्यकर्त्यांचा जोश वाढवण्यासाठी नितेश राणे यांनी स्वबळाचा नारा दिला असेल तर त्याची आपल्याला कल्पना नाही, मी चार वेळा मंत्री झालो आहे. त्यामुळे कुठे काय बोलायचे, याचे ज्ञान मला असल्याचा टोला ना. सामंत यांनी नितेश राणे यांना लगावला.
www.konkantoday.com




