कोकण मराठी साहित्य परिषदेची जिल्हा कार्यकारणी जाहीर; प्रा. आनंद शेलार यांची अध्यक्षपदी फेरनिवड

रत्नागिरी : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या (कोमसाप) जिल्हा कार्यकारणीची नवीन समिती आज जाहीर करण्यात आली. रविवार, 17 ऑगस्ट 2025 रोजी रत्नागिरीतील विवेक हॉटेलमध्ये झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत 2025 ते 2028 या तीन वर्षांच्या कालावधीसाठी नवीन कार्यकारणीची निवड बिनविरोध करण्यात आली. यामध्ये आनंद शेलार यांची अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली, तर सचिवपदी मुश्ताक खान आणि सहसचिवपदी बाळू नागरगोजे यांची निवड झाली आहे.

या बैठकीत नवीन कार्यकारणीची रचना जाहीर करण्यात आली. उपाध्यक्षपदी गोविंद राठोड आणि ॲड. वासुदेव तुळसणकर यांची निवड झाली आहे. खजिनदारपदाची जबाबदारी युयूत्सु आर्ते यांच्याकडे सोपवण्यात आली आहे, तर केंद्रीय प्रतिनिधी म्हणून बाळासाहेब लबडे यांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय कार्यकारिणीमध्ये 11 सदस्यांचा समावेश असणार आहे. सर्व निवडी बिनविरोध झाल्या असून, या निवडीमुळे कोमसापच्या भविष्यातील कार्याला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

या सभेला केंद्रीय कार्यवाह माधव अंकलगे, केशवसुत राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष गजानन पाटील, युवाशक्ती कोकण प्रांतचे अध्यक्ष अरुण मोर्ये, रत्नागिरी तालुकाध्यक्ष चंद्र मोहन देसाई, लांजा तालुका अध्यक्ष रामचंद्र जाधव, मालगुंड शाखा अध्यक्ष नलिनी खेर, देवरुख शाखाध्यक्ष दीपक लिंगायत तसेच मालगुंड शाखेचे सचिव विलास राणे, रामानंद लिमये,‌ लांजा उपाध्यक्ष डॉ. तिरमारे, सिस्टर कदम, बाळू नागरगोजे, मुश्ताक खान, युयूत्सु आर्ते, बाळासाहेब लबडे, राष्ट्रपाल सावंत आदी उपस्थितीत होते

ही सभा अत्यंत सौहार्दपूर्ण आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. बैठकीच्या सुरुवातीला उपस्थित सर्व सदस्यांचे पेन देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर अध्यक्ष आनंद शेलार यांनी प्रास्ताविक भाषण केले. त्यांनी आपल्या गेल्या कार्यकाळात (2022-2025) जिल्ह्यात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचा आढावा घेतला. त्यांच्या नेतृत्वाखाली कोमसापने साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे, असे त्यांनी नमूद केले. त्यांनी यापुढील काळातही साहित्यिक उपक्रमांना अधिक बळकटी देण्याचा संकल्प व्यक्त केला.

या बैठकीत गजानन पाटील यांनी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या स्थापनेचा उद्देश आणि इतिहासावर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, कोकणातील साहित्यिकांना एक हक्काचे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने 1991 साली पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी कोमसापची स्थापना केली. तेव्हापासून कोमसापने कोकणातील मराठी साहित्याच्या संवर्धनासाठी आणि प्रचारासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. गजानन पाटील यांनी सर्वांना एकत्र येऊन साहित्यिक कार्याला नवी उभारी देण्याचे आवाहन केले. त्यांनी कोमसापच्या माध्यमातून साहित्य, संस्कृती आणि सामाजिक बांधिलकी जोपासण्यावर भर दिला.

नवनिर्वाचित कार्यकारणीने कोकणातील साहित्यिक आणि सांस्कृतिक उपक्रमांना आणखी गती देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. आनंद शेलार यांनी अध्यक्षपदी फेरनिवड झाल्यावर सांगितले की, येत्या तीन वर्षांत कोमसापच्या माध्यमातून नवोदित साहित्यिकांना प्रोत्साहन देणे, साहित्यिक संमेलनांचे आयोजन करणे आणि कोकणातील स्थानिक भाषा आणि संस्कृतीचे जतन करणे यावर विशेष लक्ष दिले जाईल. याशिवाय, मराठी साहित्याला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी प्रयत्न केले जातील.

या बैठकीला उपस्थित सर्व सदस्यांनी नवीन कार्यकारणीच्या निवडीचे स्वागत केले. कोमसापच्या कार्याला गती देण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. नवनिर्वाचित सचिव मुश्ताक खान यांनी सांगितले की, कोमसापच्या माध्यमातून कोकणातील साहित्यिक चळवळीला नवे परिमाण प्राप्त होईल आणि येत्या काळात अनेक नवे उपक्रम राबवले जातील.

कोकण मराठी साहित्य परिषदेची ही नवीन कार्यकारणी कोकणातील साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात नवचैतन्य निर्माण करेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. आनंद शेलार यांच्या नेतृत्वाखाली आणि नवनिर्वाचित कार्यकारणीच्या सहभागाने कोमसाप आपले ध्येय साध्य करण्यासाठी कटिबद्ध आहे. येत्या तीन वर्षांत कोकणातील मराठी साहित्याला नव्या उंचीवर नेण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन या बैठकीत करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button