कोकण किनारपट्टीवर अवैध एलईडी व पर्ससीन मासेमारी विरोधात पारंपरिक मच्छीमारांचा संताप ; आंदोलनाचा इशारा!

दापोली : रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील पारंपरिक मच्छीमारांनी एलईडी व पर्ससीन मासेमारी नौकांच्या अवैध मासेमारीविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. नुकतीच दापोली तालुक्यातील उटंबर येथील राधाकृष्ण मंदिरात या विषयावर मान्यवरांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.

१ ऑगस्टपासून सुरू झालेल्या मासेमारी हंगामाच्या सुरुवातीलाच मासळीची आवक अत्यल्प आहे. त्यात बंदी असूनही एलईडी नौका आणि १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबरपर्यंतच परवानगी असलेल्या पर्ससीन जाळ्यांच्या नौकांनी थेट समुद्रात उतरण्यास सुरुवात केली आहे. रायगडातील श्रीवर्धनसह काही बंदरांवर सरकारी अधिकाऱ्यांसमोरच या नौकांची तयारी सुरू असून, विरोधाचा अभाव असल्याचे पारंपरिक मच्छीमारांचे म्हणणे आहे. या बेकायदेशीर मासेमारीमुळे गेल्या ५-६ वर्षांपासून कोकण किनारपट्टीवर मत्स्यदुष्काळ निर्माण झाला आहे. परिणामी सध्या सुमारे ८० टक्के पारंपरिक नौका बंदरात व खाड्यांमध्ये नांगरून ठेवलेल्या आहेत. उदरनिर्वाहावर गदा येऊन तरुण पिढीत या व्यवसायाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

मच्छिमार संघटनांनी मागील काही वर्षांत आंदोलने, निवेदने व पाठपुरावा करूनही शासनाकडून ठोस कारवाई न झाल्याचा आरोप करण्यात आला. शासनाने डोळेझाक केल्याने या बेकायदेशीर पद्धतींना अभय मिळाल्याचा आरोपही करण्यात आला. तसेच या मासेमारी विरोधात कायदा देखील पारित करण्यात आला आहे त्याची देखील व्यवस्थित अंमलबजावणी होताना दिसत नाही. या पार्श्वभूमीवर बेकायदेशीर मासेमारी तात्काळ थांबवावी व दोषींवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी रायगड व रत्नागिरीतील पारंपरिक मच्छीमार एकत्र आले असून लवकरच उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.

बैठकीला आमदार अशोक पाटील, मच्छिमार संघटनेचे अध्यक्ष पी. एन. चोगले, पांडुरंग चौले, मच्छिमार समितीचे कार्याध्यक्ष बाळकृष्ण चोगले, उपाध्यक्ष प्रकाश रघुवीर, पांडुरंग पावसे, दापोली मंडणगड खेड मच्छिमार कृती समितीचे सदस्य तसेच रायगड व रत्नागिरी मच्छिमार संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button