
अण्णा, आता तरी उठा, मतांची चोरी झालीय; पुण्यात अण्णा हजारेंच्या फोटोसह झळकले बॅनर!
पुणे : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीतील जंतरमंतरवर केलेलं आंदोलन जगभरात गाजलं होतं. मै हूँ अण्णा.. या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाची दखल जगभरातील अनेक माध्यमांनी घेतली होती. तर, भारतात सत्तांतर करण्यासही हे आंदोलन कारणीभूत ठरल्याचं बोललं जातं. मात्र, लोकायुक्त आणि लोकपाल यासाठी केलेल्या अण्णा आंदोलानंतर अण्णा हजारेंनी पुन्हा तितकं मोठं आंदोलन केल्याचं कुठंही पाहण्यात आलं नाही. विशेष म्हणजे 2014 च्या अगोदर झालेल्या या आंदोलनचा मोठा फटका काँग्रेसला बसला. त्यानंतर, देशात आणि महाराष्ट्रातही भाजपचे सरकार सत्तेवर आले. मात्र, त्यानंतर अण्णांचं आंदोलन कुठेही झालं नाही. त्यामुळे, अनेकदा सोशल मीडियातून अण्णांना ट्रोलही केलं जातं. आता, पुन्हा एकदा पुण्यातून अण्णांना प्रश्न विचारण्यात आले आहेत.
पुण्यातील पाषाण भागात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना बॅनरच्या माध्यमातून पुणेरी टोले लगावण्यात आले आहेत. अण्णा आता तरी उठा… असे म्हणत पुण्यात अण्णा हजारे यांना आवाहन करणारे बॅनर्स झळकले असून या बॅनर्सची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. अण्णा हजारे यांनी सध्याच्या सरकारविरुद्ध भूमिका घेत आंदोलन करावे, किंवा सरकारला सवाल करावे असाच आशय या बॅनर्समधून दिसून येतो. अण्णा आतातरी उठा…कुंभकर्णसुद्धा गाढ झोपेतून रावणासाठी आणि लंकेसाठी उठला होता. तुम्ही आपल्या देशासाठी आतातरी उठा, असे म्हणत अण्णांना आवाहन करण्यात आलंय.
- देशात मतांची चोरी होत असताना,
- देशात भ्रष्टाचार फोफावला असताना,
- देशात हुकूमशाही माजलेली असताना,
- देशाची लोकशाही धोक्यात असताना.
- अण्णा तुमच्या सारखा जेष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
अण्णा, दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर पुन्हा तुमची जादू पाहण्यासाठी देश आतुर आहे. अशा आशयाचे बॅनर पुण्याच्या पाषाण परिसरात लावण्यात आले आहेत. पाषाण भागातील सामाजिक कार्यकर्ते समीर उत्तरकर यांनी हे बॅनर्स आपल्या नावासह लावले असून सध्याच्या राजकीय परिस्थितीवर, मतचोरीवर अण्णांनी बोलावे, आंदोलन करावे, अशी मागणी या बॅनरमधून करण्यात आलीय.




