
दहीहंडीनिमित्त रत्नागिरी शहरातील वाहतुकीत बदल
रत्नागिरी : गोकुळाष्टमीच्या निमित्ताने रत्नागिरी शहरात आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी उत्सवासाठी पोलिसांनी वाहतुकीत बदल केले आहेत. श्रीप्रतिष्ठान रत्नागिरीच्या वतीने मांडवी समुद्रकिनारी दहीहंडीचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक एकत्र येणार असल्याने संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी, १६ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते रात्री १२ वाजेपर्यंत भूते नाका ते मांडवी समुद्रकिनारा हा मार्ग सर्वसामान्य वाहनांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. या संदर्भात रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा आणि मोटार वाहन कायद्यातील अधिकारांचा वापर करून वाहतूक नियंत्रण अधिसूचना जारी केली आहे.
वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग म्हणून वाहनचालक भूते नाका-मिरकरवाडा तीठा-मत्स्यालय मार्गे मांडवी समुद्रकिनाऱ्याकडे जाऊ शकतात. ही वाहतूक नियंत्रण अधिसूचना पोलीस वाहने, अग्निशमन दलाची वाहने (फायर ब्रिगेड), रुग्णवाहिका तसेच शासकीय आणि व्ही.आय.पी. दौऱ्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांना लागू होणार नाही. आवश्यकतेनुसार, घटनास्थळी उपस्थित असलेले पोलीस अधिकारी योग्य तो निर्णय घेऊ शकतील. या अधिसूचनेबद्दल वाहनचालकांना किंवा नागरिकांना काही आक्षेप असल्यास, त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात नोंदवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. दाखल करण्यात आलेल्या हरकतींचा पुढील अधिसूचनेवेळी विचार केला जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.




