
तावडे अतिथी भवन, आडिवरे गावच्या विकासात भरीव योगदान देईल- विनोद तावडे

रत्नागिरी – तावडे हितवर्धक मंडळाचे आडिवरे येथील तावडे अतिथी भवन ही केवळ एक वास्तू नसून, ती पर्यटनाच्या माध्यमातून आडिवरे परिसरातील गावांच्या विकासासाठी भविष्यात भरीव योगदान देणारी वास्तू ठरेल. तसेच 2047 मध्ये विकसित भारताच्या दृष्टीने प्रत्येकाने योगदान दिले पाहिजे, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय महासचिव व राज्याचे माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केले.
तावडे अतिथी भवन येथे विनोद तावडे यांच्या हस्ते प्रथमच ध्वजारोहण करण्यात आले. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
या वेळी मंचावर मंडळाचे अध्यक्ष दिनकर तावडे, सतीश तावडे, आर्किटेक्ट संतोष तावडे , राजेंद्र तावडे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, सरपंच आरती मोगरकर, माजी आमदार बाळ माने, अतुल काळसेकर, शिल्पा मराठे, अॅड. दिपक पटवर्धन आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री. विनोद तावडे म्हणाले की, मंडळाचे अध्यक्ष दिनकर तावडे, सतीश तावडे हे अनेक वर्षांपासून तावडे हितवर्धक मंडळ चांगल्या रीतीने चालवत आहेत. जेव्हा मंडळाकडे कोणी जास्त लक्ष देत नव्हते, तेव्हाही ते अनेक कार्यक्रम करत होते. आडिवरे गावी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या तावडे मंडळींसाठी भक्त निवास व्हावे, असे ठरले आणि आर्किटेक्ट संतोष तावडे यांनी अत्यंत कल्पकतेने इतकी सुरेख आणि देखणी वास्तू उभी केली. पर्यटनाचा एक उत्कृष्ट नमुना इथे उभा केला. या वास्तुला धार्मिक महत्व आणि पावित्र्य तर आहेच शिवाय इथे वेगवेगळे सामाजिक कार्यक्रम, लग्न समारंभासारखे धार्मिक कार्यक्रम सुद्धा मोठ्या प्रमाणावर होत असतात. पहिला टप्पा पूर्ण झाला आहे आणि आता दुसऱ्या टप्प्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती व त्यातून भविष्यात आडिवरे परिसरातले अर्थकारण बदलेल अशी माझी खात्री आहे.
श्री. तावडे पुढे म्हणाले की, खऱ्या अर्थाने देश स्वतंत्र होण्यासाठी अनेकांनी बलिदान दिलं. पण आता बलिदान न देत देशाचा विकास करून भारत जगात नंबर एक होण्यासाठी काय योगदान असू शकते हे ठरवण्याचा आजचा स्वातंत्र्यदिन आहे. स्वतंत्र भारतापासून विकसित भारत होण्यासाठीची चर्चा प्रत्येक गावात व्हायला हवी. देशाप्रती काही करण्याची भावना करू ज्यामुळे 2047 ला विकसित भारत होईल आणि त्याचा खऱ्या अर्थाने आपल्याला आनंद होईल.
————————————