
चिपळुणात आगामी आमदार भाजपचा: मंत्री नीतेश राणे;
मागील विधानसभा निवडणुकीत अवघ्या ६८०० मतांनी मागे पडलेल्या प्रशांत यादव यांना येत्या पाच वर्षांत भाजप पक्षाकडून ताकद दिली जाईल. त्याच्या जोरावर २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत चिपळूण मतदारसंघातून ते आमदारही होतील, असा विश्वास मत्स्य व बंदर विभागाचे मंत्री नीतेश राणे यांनी येथे व्यक्त केला.याचवेळी त्यांनी कार्यकर्त्याला न्याय मिळण्यासाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेतही दिले.
चिपळूण दौऱ्यावर आलेल्या मंत्री नीतेश राणे यांनी प्रशांत यादव यांच्या भाजप प्रवेशाबाबत माहिती देताना म्हणाले की, काँग्रेस पक्ष आम्ही पाहिला आहे; परंतु भारतीय जनता पक्षासारखा पाठीशी उभा राहणारा दुसरा राजकीय पक्ष नाही. तेव्हा यादव यांच्या सोबतही ही ताकद कायम उभी राहील. आतापर्यंत मी स्वतः तीन निवडणुका लढलो आहे; परंतु ६ हजार ८०० मतांच्या फरकाने निवडणुकीला सामोरे जाणे सोपे नाही. यादव यांनी आधीच स्वतःला सिद्ध केले असून, त्याचा भाजपला स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत नक्कीच फायदा होईल; मात्र त्यासाठी यादव यांना पद देऊन त्यांची ताकद वाढवायला हवी. त्यांच्या नावापुढे पद नसेल तर ते काय करणार? ते निधी कसा देणार असे प्रश्न असून, भाजप त्यांच्या पाठीशी ताकदीने उभा राहील, असा विश्वास व्यक्त केला.