
मुंबई-गोवा महामार्ग जनआक्रोश समितीच्या आंदोलनाला यश
उपमुख्य अजित पवार यांनी बोलवली बैठक : समितीच्या ९९ टक्के मागण्या मान्य
आबलोली (संदेश कदम) : मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डेमय रस्त्यांमुळे वाहनचालकांना वाहन चालवणे जिकिरीचे झाले असून, वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे बुजवून रस्ता वाहन चालविण्यायोग्य करावा, या मागणीसाठी मुंबई-गोवा महामार्ग जनआक्रोश समितीकडून आंदोलन छेडण्यात आले होते. या आंदोलनाची दखल घेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्वरित त्यांच्या मंत्रालयातील दालनात रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या मध्यस्थीने बळीराज सेना आणि मुंबई-गोवा महामार्ग जनआक्रोश समितीची तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे, कोकण आयुक्त डॉ. सूर्यवंशी, सर्व जिल्हाधिकाऱ्यांसहित संबंधित वरिष्ठ अधिकारी यांच्या समवेत बैठक घेण्यात आली.
या बैठकीत जनतेच्या मुंबई-गोवा महामार्गसंबंधित मागण्या होत्या त्या बहुतांश मागण्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मान्य करून संबंधितांना अधिकाऱ्यांना २२ कोटी रुपये फंडाची तरतूद करत त्वरित उद्यापासूनच त्यावर काम करण्याचे करण्यासाठी आदेश दिले. मुंबई-गोवा महामार्ग जनआक्रोश समितीच्यामार्फत पुढील मागण्या सरकार समोर ठेवण्यात आल्या आहेत. येणाऱ्या गणेशोत्सवापूर्वी महामार्गावरील दोन्ही बाजूचे खड्डे पेवरब्लॉकने बंद करण्यात यावेत. महामार्ग पाऊस गेल्यानंतर तीन महिन्यात पूर्ण करण्यात यावा. संबंधित भ्रष्ट अधिकारी व ठेकेदारांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात यावे. २०१० सालापासून आतापर्यंत जे मृत्युमुखी पडले त्यांच्या नातेवाईकांना भरघोस आर्थिक मदत करावी. महामार्गावर प्रवास करताना अपघातात अपंगत्व आले आहे किंवा अपघाती घरात जो तरुण असेल त्याला सरकारी नोकरी द्यावी. महामार्गावर प्रत्येक २५ किलोमीटर अंतरावर सुलभ सौचालय, ट्रॉमा केअर सेंटर उभारावी. प्रत्येक २५ किलोमीटर अंतरावर डॉक्टर,स्टाफ व सर्व सोयी सहित ॲम्बुलन्स उभी पाहिजे. थोड्या थोड्या अंतरावर दोन्ही दलाचे पोलीस २४ तास सेवेकरिता उपलब्ध असावेत. जेणेकरून मध्येच कोणी गाड्या घालणार नाहीत आणि त्यामुळे ट्रॅफिक होणार नाही. जेथे गतिरोधक बनवलेले आहेत त्यावर झेब्रा पट्टी मारण्यात यावी. महामार्गावरील ड्रायव्हरजनच्या ठिकाणी ठळक अक्षरात सूचनाफलक लावण्यात यावेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती स्थापन करून त्यात आमचे ४ सदस्य असावेत.
यापैकी ९९ टक्के मागण्या या बैठकीत उपमुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या म्हणून आम्ही मुंबई-गोवा महामार्गाचा महाराजा गणपती उत्सवरूपी जे आंदोलन घेणार होतो ते तात्पुरते तरी स्थगित करत आहोत, अशी माहिती बळीराज सेनेचे प्रमुख अशोकदादा वालम यांनी दिली.