
खोपोली घाटात अचानक 100-200 गाड्या पडल्या बंद, क्लच प्लेट जळाल्या, नेमकं कारण काय?
स्वातंत्र्यदिनाची सार्वजनिक सुट्टी आणि लागून आलेला शनिवार, रविवार या लाँग विकेंडमुळे लोणावळा-खंडाळा परिसरात पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. हजारो मुंबईकर आणि पुणेकर लोणावळ्यात येत आहेत. अशात पर्यटनासाठी बाहेर पडलेल्या लोकांसाठी वाईट बातमी समोर आली आहे. ही बातमी म्हणजे खोपोली घाटात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जुन्या खोपोली घाटात अचानक १०० ते २०० गाड्या रस्त्यात बंद पडल्या आहेत. या सर्व गाड्या घाटात रस्त्याच्या कडेला लावण्यात आल्या आहेत. अशाच प्रकारे एकाच वेळी १०० ते २०० गाड्या बंद पडल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या सर्व गाड्यांचे क्लच प्लेट जळाले आहेत. अशा सुट्टीच्या काळात अशाप्रकारे घाटात गाड्या बंद पडल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.
यामुळे लाँग विकेंड एन्जॉय करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. प्राथमिक माहितीनुसार, ज्या गाड्या घाटात बंद पडल्या आहेत. त्यातील बहुसंख्य गाड्या सीएनजी इंधनावर चालणाऱ्या असल्याची माहिती आहे. या गाड्या घाट चढू न शकल्यामुळे गाड्यांचे क्लच प्लेट जळाले आहेत. या प्रकारामुळे घाटात मोठ्या प्रमाणत वाहतूक कोंडी झाली आहे.
त्यामुळे सुट्टीसाठी घराबाहेर पडत असाल तर जुना खोपोली घाटातून जाणं टाळणं सोयीस्कर राहील. त्याऐवजी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचं आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आलं आहे. सध्या घाटात मंद गतीने वाहतूक सुरू आहे. मात्र एकाच वेळी अशाप्रकारे शेकडो गाड्या बंद पडल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.