
विशेष लेख क्र.4. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष रुग्णांसाठी संजीवनी
आज अखेर ३१ रुग्णांना २४ लाख ३० हजार मदत
पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या 2 मे रोजी रत्नागिरी येथे उद्घाटन झालेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाच्या माध्यमातून आज अखेर 31 रुग्णांना 24 लाख 30 हजार रुपयांची मदत झाली आहे. यातील काही अनुभव, प्रतिक्रिया या लेखात देत आहोत.
कुलदीप खातू – माझे वडील प्रकाश खातू यांचे गुडघा रोपण करायचे होते. त्यासंदर्भात माहिती घेण्यासाठी मी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाशी संपर्क साधला. मला योग्य माहिती मिळाली आणि तसा अर्ज केला. त्यानंतर खात्यामध्ये 50 हजार रुपये जमा झाले. त्याबद्दल मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खूप खूप मन:पूर्वक आभार मानतो.
ओंकार प्रमोद पाटील- माझा मेहुणा केतन प्रकाश नारकर याला मेंदूचा आजार झाल्यामुळे कोल्हापूर येथे उपचारासाठी दाखल केले होते. तिथला येणारा अंदाजे खर्च 7 लाख रुपये एवढा होता. त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती गंभीर असल्यामुळे त्याला एवढा खर्च करणे शक्य होत नव्हतं. अडचणी येत होत्या. आम्ही मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाकडे संपर्क केला. सहाय्यता कक्षाकडून आम्हाला 50 हजार रुपये मंजूर झाले. त्यासाठी सहाय्यता कक्षातून आम्हाला सर्वांनी मदत केली. तात्काळ रक्कम उपलब्ध करुन दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खूप खूप आभारी आहे.
अमोल एकनाथ महाडिक – माझ्या मुलीला एक महिन्यापासून बाल रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले होते. तिला थोडी मेंदूची समस्या होती. त्यामुळे त्या आजारासाठी येणारा खर्च माझ्यासाठी खूप त्रासदायक होता. त्यामुळे मी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षामध्ये अर्ज वगैरे भरुन त्यांची मदत घेतली. मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाकडून आम्हाला 50 हजार एवढी रक्कम मिळाली. त्याबद्दल आम्ही आभार मानतो.
मयुरी मनोहर तळेकर – माझे वडील दत्तात्रय शंकर पांचाळ यांच्यावर मेंदूची शस्त्रक्रीया झाली. मी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाकडे मदतीसाठी अर्ज केला. या कक्षाच्या माध्यमातून त्यांनी 1 लाख रुपयांची मदत केली. माझी परिस्थिती फार हालाखिची आहे. या मदतीबद्दल मनःपूर्वक आभार.
पराग चंद्रकांत भाटकर – माझ्या भाचीला कोल्हापूर येथे उपचारासाठी केले होते. तिच्या मेंदूची शस्त्रक्रिया करावयाची होती. त्यासाठी साडे तीन लाख रुपये खर्च अपेक्षित होता. पैशांची कमतरता असल्याने पैसे जुळावाजुळव चालू होती. तेव्हा आम्हाला समजलं की मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षातून मेंदूवरील शस्त्रक्रियेसाठी पैसे मिळतात. म्हणून आम्ही मुख्यमंत्री सहाय्यता कक्षात चौकशी केली. त्याठिकाणी अमित कोरगावकर होते. त्यांनी आम्हाला कोणती कागदपत्रं पाहिजेत, त्याची माहिती दिली. त्याप्रमाणे आम्ही त्यांना सर्व कागदपत्रे दिली. कागदपत्रं दिल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी 1 लाख हॉस्पिटलच्या खात्यात जमा झाले.
रुग्ण, त्यांचे नातेवाईक त्यांच्या प्रतिक्रिया म्हणजे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष हा सर्वसामान्य नागरिकांसाठी संजीवनी ठरत आहे. -प्रशांत कुसुम आनंदराव सातपुते जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी




