
पुढील तीन दिवस राज्यात घरांची खरेदी-विक्री व्यवहार ठप्प.राज्यातील नोंदणी विभागाचे कामकाज राहणार तांत्रिक कारणास्तव बंद!
ठाणे : राज्यातील नोंदणी विभागाच्या आय-सरीता या प्रणालीच्या तांत्रिक देखभाल आणि दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. या कामामुळे विभागाचे कामकाज बंद राहणार असल्याने पुढील तीन दिवस राज्यात घरांच्या खरेदी-विक्री, भाडेकरार तसेच इतर दस्त नोंदणीची कामे तीन दिवस बंद राहणार आहेत.
राज्यातील नोंदणी विभाग सलग तीन दिवस बंद राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे राज्यातील सर्व दस्त नोंदणी आणि त्यासंबंधित सेवेतील काम थांबणार आहे. ही सेवा १४ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२ वाजल्यापासून बंद होणार असून थेट १७ ऑगस्ट मध्यरात्री १२ वाजता सुरु होणार आहे. नोंदणी विभाग हा जिल्हा प्रशासनातील एक महत्त्वाचा घटक आहे. जमिनीचे, घरांचे आणि इतर स्थावर मालमत्तांचे व्यवहार कायदेशीर करण्यासाठी त्याची नोंदणी आवश्यक असते. व्यवहाराची नोंदणी ही केवळ कायदेशीर पुरावा नसून, मालमत्तेवर मालकी हक्क स्थापित करण्याचा अधिकृत दस्तऐवज असतो. परंतू, आता तीन दिवस नोंदणी विभाग बंद राहणार असल्यामुळे सर्व व्यवहार ठप्प होणार आहेत.
नोंदणी विभागाच्या आय-सरीता (i-Sarita) प्रणालीतील सर्व्हरचे तांत्रिक देखभाल आणि दुरुस्तीची काम हाती घेण्यात येत आहे. त्यामुळे नोंदणी विभाग तीन दिवस बंद राहणार असून त्याअंतर्गत होणाऱ्या सर्व सेवांचे काम थांबणार आहे. या सेवा १४ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२ वाजल्यापासून बंद होणार आहे. तर, १७ ऑगस्ट मध्यरात्री १२ वाजता सुरु होणार आहे. त्यामुळे संबंधित पक्षकार आणि दस्त नोंदणी करणारे व्यावसायिक यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन नोंदणी उपमहानिरीक्षक (मुख्यालय), महाराष्ट्र राज्य, पुणेचे उदयराज चव्हाण यांनी केले आहे.
नोंदणी विभागात या सेवा दिल्या जातात…
नोंदणी विभागाचा महसूल वसुलीत मोठा वाटा असून विविध प्रकारच्या स्टॅम्प शुल्क आणि नोंदणी शुल्कातून शासनाला मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळते. तसेच वाद टाळण्यासाठी व मालमत्ता बाजारात पारदर्शकता राखण्यासाठी हा विभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. हा विभाग तीन दिवस बंद राहणार असल्यामुळे मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहार, गृहकर्जासाठी आवश्यक दस्तनोंदणी प्रक्रिया, बांधकाम प्रकल्पांचे फ्लॅट हस्तांतरण, भाडेकरार नोंदणी, तसेच कोर्टनिर्णयाशी संबंधित मालमत्ता व्यवहार यामध्ये तात्पुरता अडथळा येणार आहे.
बंदमुळे आर्थिक व्यवहारावर परिणाम
नोंदणी विभाग तीन दिवस बंद असल्यामुळे आर्थिक व्यवहारांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. तर गृह नोंदणीचे व्यवहार ठप्प होणार असल्याने बांधकाम क्षेत्रालाही फटका बसणार आहे. दरम्यान, नोंदणी विभागाने नागरिकांना शक्य असल्यास १४ ऑगस्टपूर्वी किंवा १७ ऑगस्टनंतरच व्यवहार करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच आय-सरीता (i-Sarita) प्रणालीतील सर्व्हरचे काम पूर्ण झाल्यानंतर सर्व सेवा सुरळीत सुरू होईल, असे स्पष्ट केले आहे.