
नागरिकांच्या तक्रारींना त्वरित प्रतिसाद देण्याच्या उद्देशाने रत्नागिरी पोलिसांचे ’मिशन प्रतिसाद’ अभियान
रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या कल्पकतेतून जिल्हा पोलिसांनी ’मिशन प्रतिसाद’ नावाचे अभिनव अभियान सुरू केले आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश नागरिकांच्या तक्रारींना त्वरित व प्रभावी प्रतिसाद देणे हा आहे, विशेषतः वृद्ध नागरिकांना मदत करण्यावर यात भर देण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे.
चिपळूण येथे नुकत्याच घडलेल्या निवृत्त शिक्षका वर्षा जोशी यांच्या खूनप्रकरणानंतर एकटे घरात राहणार्या ज्येष्ठ नागरिकांची पुन्हा एकदा सुरक्षा ऐरणीवर आली आहे. त्यामुळे ’मिशन प्रतिसाद’ अंतर्गत वृद्ध आणि एकटे राहणार्या नागरिकांसाठी एक विशेष कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये बिट अंमलदार आणि पोलीस पाटील हे ४५ वर्षांवरील एकट्या व्यक्तींच्या घरी जाऊन त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहेत व त्यांच्या असणार्या अडचणी महाराष्ट्र पोलीस समजून घेणार आहेत. यामुळे त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना मदत करणे सोपे होईल.
या अभियानांतर्गत प्रत्येक पोलीस ठाण्यात ’नोडल अधिकारी’ नियुक्त करण्यात आले आहेत. हे अधिकारी थेट नागरिकांशी संपर्क साधून त्यांच्या समस्यांचे निराकरण करतात, ज्यामुळे नागरिकांना छोट्या-मोठ्या कामांसाठी वरिष्ठ अधिकार्यांकडे जाण्याची गरज भासणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. या अभियानामुळे पोलिसांची कार्यक्षमता वाढेल त्याचबरोबर नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ होईल. ’मिशन प्रतिसाद’मुळे पोलिसांचे काम अधिक पारदर्शक होईल आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यास मदत मिळणार आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले असून, एकट्या आणि गरजू वृद्ध नागरिकांसाठी हा उपक्रम खर्या अर्थाने ’प्रतिसाद’ देणारा ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
www.konkantoday.com




