
ज्ञानदीपची राधा गांधी – लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिन सोहळ्यास आमंत्रित
(चिपळूण) – भारत सरकार व संरक्षण मंत्रालय आयोजित देशव्यापी पेंटिंग स्पर्धेत ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल, खेड येथील कुमारी राधा निलेश गांधी हिने उल्लेखनीय यश संपादन करत संपूर्ण कोकणची मान अभिमानाने उंचावली आहे. देशभरातील तब्बल ६,३२३ स्पर्धकांमधून निवडलेल्या १९७ विजेत्यांमध्ये राधाने यामध्ये आपले स्थान मिळवत ३६ वा क्रमांक पटकावला आहे.
१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन या राष्ट्रीय पर्वाच्या औचित्याने झालेल्या या स्पर्धेत राधाच्या कल्पकतेला आणि कलागुणांना सर्वोच न्याय मिळाला आहे. या विशेष यशामुळे तिला दिल्ली येथील लाल किल्ल्यावर होणाऱ्या स्वातंत्र्य दिन सोहळ्यास प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे सन्माननीय आमंत्रण मिळाले आहे. ही उपस्थिती तिच्या कलात्मक मेहनतीची आणि चिकाटीची खरी दाद आहे.
राधाच्या या यशामुळे ज्ञानदीप शिक्षण संस्था,खेड तिचे पालक तसेच संपूर्ण खेड आणि चिपळूण तालुका अभिमानाने उजळला आहे. केवळ चिपळूण आणि खेड नव्हे तर संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
राधाचे वडील श्री. निलेश गांधी हे चिपळूणमधील नामांकित व्यावसायिक असून ‘गांधी लाइट्स’ या नावाने त्यांचा व्यवसाय परिचित आहे. कलेच्या क्षेत्रातील मुलीच्या या भव्य यशामुळे गांधी कुटुंबाचा गौरव आणखी वृद्धिंगत झाला आहे.
या अभिमानास्पद यशाबद्दल ज्ञानदीप शिक्षण संस्था, खेडचे अध्यक्ष श्री. अरविंद तोडकरी, सर्व सन्माननीय संचालक मंडळ, राधाचे काका आणि श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. उदय गांधी व सर्व सन्माननीय संचालक मंडळ, चिपळूण नगरपरिषदेचे माजी नगरसेवक श्री. अशोक गांधी, प्रतिथयश उद्योजक श्री.सुरेश गांधी, चिपळूण वैश्य समाज, व्यापारी वर्ग, विविध सामाजिक व शैक्षणिक संस्था, राजकीय पदाधिकारी तसेच चिपळूणवासीय यांच्या वतीने राधाचे विशेष अभिनंदन करण्यात येत आहे.