
सातारा गॅझेटमध्ये पुरावा मोठा; कुणब्यांचेच झाले मराठा!
Maratha reservation : मुंबई येथे झालेल्या मराठा समाजाच्या आंदोलनानंतर सातारा गॅझेटवर मोठी चर्चा सुरू झाली आहे. मराठा समाजाला न्याय देण्याची सरकारने सकारात्मक भूमिका घेतल्यानंतर आणि सातारा गॅझेटवर एक महिन्यात निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर सातारा गॅझेट म्हणजे नेमके आहे तरी काय? याविषयी चर्चा सुरू झाली आहे. याचे संदर्भ 1881 पासून धुंडाळल्यानंतर काही मुद्दे समोर आले आहेत.
सातारा गॅझेटमधील नोंदीनुसार सातारा जिल्ह्यामध्ये सर्वच लोक कुणबी होते. जिल्ह्यात 1881 च्या जनगणनेत ‘मराठा’ जात अस्तित्वात नव्हती. याचा अर्थ सगळे कुणबी होते. सन 1901 साली सातारा जिल्ह्याची लोकसंख्या 8 लाख 49 हजार 672 होती. 1881 च्या जनगणनेनुसार 5 लाख 83 हजार 569 कुणबी होते. सातारा जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येच्या 70-75 टक्के कुणबी होते. याच न्यायाने राज्यातील सर्व मराठे पूर्वाश्रमीचे कुणबीच आहेत. सातारा गॅझेटमधील स्पष्टीकरणामुळे हे गॅझेट लागू केल्यास मराठा समाजाला मोठ्या प्रमाणामध्ये कुणबीचे दाखले मिळू शकतात.
काळाच्या ओघात कुणबी विलुप्त होवून ‘मराठा’ झाले. जातीचं नाव बदललं तरी जातवास्तव तेच आहे. सातारा जिल्ह्यातील 75 टक्के पूर्वाश्रमीच्या कुणब्यांना आणि पर्यायाने मराठवाडा, विदर्भासह महाराष्ट्रातील गरजवंत कुणबी मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्याची नैतिक जबाबदारी सरकारवर आली होती. सातारा गॅझेट, हैदराबाद गॅझेट सारखा अत्यंत महत्वाचा दस्तावेज उपलब्ध आहे. जो जाती-जमातींचा समाजशास्त्रीय दृष्टीकोनातून केलेला अभ्यास म्हणून पायाभूत संदर्भ मानला जातो. त्यामुळे सरकारचे काम सोपेच झाले आहे.
1981 नंतरही जिल्ह्याची जनगणना झाली होती. सातारा गॅझेट (1885) नुसार, सातारा जिल्ह्यातील एकूण लोकसंख्या 10 लाख 62 हजार 350 होती. यापैकी कुणबी समाजाची लोकसंख्या 2 लाख 50 हजारापेक्षा जास्त होती. या लोकसंख्येत मराठा आणि कुणबी या दोन्ही जातींचा समावेश आहे, कारण त्यावेळी अनेक ठिकाणी त्यांना एकाच गटात मोजले जात असे. त्यामुळे, गॅझेटमधील आकडेवारीनुसार, कुणबी समाजाची लोकसंख्या त्या काळातील सातारा जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येपैकी एक मोठा भाग होती, जे एकूण लोकसंख्येच्या सुमारे 23 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
गॅझेटियरची रचना : 1885 चे सातारा गॅझेटियर ब्रिटिश सरकारने प्रशासकीय आणि भौगोलिक माहिती गोळा करण्यासाठी तयार केले होते. यात जिल्ह्याची लोकसंख्या, जाती, व्यवसाय, कृषी आणि इतर सामाजिक बाबींची तपशीलवार माहिती दिली आहे.
सामाजिक वर्गीकरण : गॅझेटियरमध्ये कुणबी समाजाला ‘मराठा’ गटाचा एक भाग मानले गेले आहे. कारण, त्यांच्यामध्ये सामाजिक आणि व्यावसायिक समानता होती, विशेषतः शेतीशी संबंधित.
व्यवसाय : कुणबी समाजाचे लोक प्रामुख्याने शेती आणि शेतीशी संबंधित कामांमध्ये गुंतलेले होते, ज्यामुळे त्यांना जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानले जात होते.




