स्तोत्रकाव्यांजली कार्यक्रमात श्रोते मंत्रमुग्ध

स्वानंद पठण मंडळ; संस्कृत भारतीतर्फे संस्कृत सप्ताह

रत्नागिरी : संस्कृत भारतीतर्फे आयोजित संस्कृत सप्ताहानिमित्त स्वानंद पठण मंडळाने सादर केलेल्या ‘स्तोत्रकाव्यांजली’ कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद लाभला. सर्व स्तोत्रांचा मूळ बाज न घालवता त्यांना साजेशा चाली देऊन ही स्तोत्र सुरेल आवाजात सादर करण्यात आली.

शहरातील शेरेनाका येथील रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या राणी लक्ष्मीबाई सभागृहात हा कार्यक्रम झाला. सुरवातीला संस्कृत भारतीच्या कोकण प्रांताध्यक्ष व गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या उपप्राचार्या, संस्कृत विभागप्रमुख डॉ. कल्पना आठल्ये यांनी स्वानंद पठण मंडळाच्या सर्व सदस्यांचे पुस्तक व भेटवस्तू देऊन स्वागत केले. निवेदन नेत्रा मोडक यांनी केले. अक्षया भागवत यांनी आभार मानले.

स्वानंद पठण मंडळाच्या प्रमुख रेखा जोशी आणि स्वरदा जोशी, वैशाली चितळे, योजना घाणेकर, मानसी फडके, अनिता पेंढारकर, शुभांगी मुळे, कीर्ती आठवले, माणिक पाटणकर, वृंदा गोखले, संपदा पेठे यांनी ही स्तोत्रे सुरेखरित्या सादर केली. स्तोत्रांना संगीत शिक्षिका स्वरदा जोशी यांनी चाली लावल्या आहेत.

सुरवातीला जगद्गुरु आद्य शंकराचार्यांनी रचलेले भुजंग प्रयात स्तोत्र सादर केले. यात गणपतीची विविध रुपे, त्याचे तेज, करुणा, विद्या व शक्ती यांचे सुंदर वर्णन आहे. या स्तोत्रामुळे वाचासिद्धि, कामनापूर्ती, विघ्न निवारण होते. त्यानंतर ध्यान, जप आणि स्तवन या तिन्हींचा अनुभव देणारे सांब स्तुती स्तोत्र, जगद्गुरु आद्य श्री शंकराचार्य रचित श्री त्रिपुरा सुंदरी स्तोत्र सादर केले. यात परब्रह्म स्वरूपिणी सर्व शक्तींची अधिष्ठात्री, देवीच्या त्रैगुणात्मक शक्तींचे व सौंदर्य, करुणा, ज्ञान, सामर्थ्य यांची स्तुती आहे. हे ऐकताना फक्त स्तुती नसून ध्यान व साधनाही असल्याचे जाणवले. शृंगेरी मठाधिपती श्री श्री भारतीतीर्थ रचित महाविष्णू स्तोत्र यावेळी सादर करण्यात आले. या स्तोत्रात अध्यात्मिकतेसोबत वैदिक परंपरालचा सखोल ठसा दिसून आला. भक्ताला शरण येणारा, पाप, तापापासून मुक्त करण्यासाठी हे स्तोत्र म्हटले जाते.

अत्यंत अद्वितीय व विलक्षण संस्कृत काव्य म्हणजे राघव यादवीयम्. पं. वेंकटाध्वरी या अष्टावधान पंडितांनी हे रचलेले हे द्व्यर्थी काव्य या वेळी स्वानंद पठण मंडळाच्या भगिनींनी सुरेख सादर केले. या काव्याची विशेषता म्हणजे हा श्लोक डावीकडून उजवीकडे किंवा उजवीकडून डावीकडे म्हटला तरी अर्थपूर्ण होतो, यालाच अनुलोम, विलोम काव्य म्हणूनही ओळखतात. एकूण ६० श्लोक चंद्रकंस व केदार या रागात गुंफून सादर करण्यात आले. यात पहिला भाग अनुलोम म्हणजे राघवीयम्, रामकथा होता व दुसरी बाजू हा विलोम म्हणजे यादवीयम् म्हणजे कृष्णकथा होतो. विलक्षण बुद्धिमत्तेने एकाच काव्यात या दोन्ही बाजू लपल्या आहेत. या कार्यक्रमाचा आस्वाद रत्नागिरीतील श्रोत्यांनी घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button