
जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्रातील खेळाडूंना गणवेश वाटप
रत्नागिरी, दि. १३ :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाद्वारे जिल्ह्यात क्रीडा प्रशिक्षण केंद्र चालवले जातात. या केंद्रातील खेळाडूंना सन २०२४-२५ या वर्षासाठी क्रीडा गणवेशाचे वाटप करण्यात आले आहे.
जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांच्या उपस्थितीत तीनही प्रशिक्षण केंद्रांमध्ये हे वाटप झाले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. शिंदे यांनी खेळाडूंना नियमित सरावाचे महत्त्व सांगितले. मान्यताप्राप्त खेळात अतिउच्च कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्तीबाबत मार्गदर्शन केले.
जिल्ह्यात सध्या जिम्नॅस्टिक्स, व्हॉलीबॉल आणि खो-खो या तीन खेळांचे मार्गदर्शन दिले जाते. जिम्नॅस्टिक्सचे प्रशिक्षण एस व्ही जे सी टी क्रीडा संकुल, डेरवण येथे दिले जाते, येथे मागील तीन वर्षांपासून २० ते २५ खेळाडू नियमित प्रशिक्षण घेतात. व्हॉलीबॉल आणि खो-खो खेळांसाठीचे मार्गदर्शन जिल्हा क्रीडा संकुल, मारुती मंदिर येथे दिले जाते. येथे मागील दोन वर्षांपासून ४५ ते ५० खेळाडू नियमित प्रशिक्षण घेत आहेत.
खो-खो खेळासाठी प्रशिक्षक ऐश्वर्या सावंत, व्हॉलीबॉल प्रशिक्षक गणेश खैरमोडे आणि जिम्नॅस्टिक्स प्रशिक्षक सचिन माडंवकर प्रशिक्षण देत आहेत.




