
जगबुडी नदी गाळ उपसा व बेकायदा वाळू उत्खननावर ऍड. अनिल परब यांनी मागितली खेड तहसिलदारांकडे माहिती
माजी परिवहन मंत्री व विधान परिषदेचे सदस्य ऍड. अनिल परब यांनी खेड तहसीलदारांना जगबुडी नदीतील गाळ उपसा आणि तालुक्यातील बेकायदा गौणखनिज (वाळू) उत्खनन प्रकरणी सवाल उपस्थित करीत सविस्तर माहिती देण्याची लेखी मागणी खेड तहसिलदारांकडे केली आहे.
शासनाने २५ जुलै २०२३ रोजी गाळ उपसा करण्यास मंजुरी दिल्यानंतर प्रत्यक्षात कोणत्या सामाजिक संस्था किंवा व्यक्तींनी स्वखर्चाने गाळ काढण्याची मागणी केली, त्यावर तहसिल प्रशासनाने कोणती कारवाई केली, परवानगी दिली का, दिल्यास कोणाला व कशा प्रकारे याचा तपशील, मूळ अर्जाच्या प्रती व रजिस्टर नोंदींसह, परब यांनी मागितला आहे. गाळ उपसा जलसंपदा विभागामार्फत झाला असल्यास, काढलेला गाळ कसा व कोणाला वितरित केला, किती शेतकर्यांनी अर्ज केले, कोणती कागदपत्रे जोडली, किती घनमीटर गाळ दिला व तो कुठे वापरला याची माहिती जिओटॅग फोटो, व्हिडीओसह देण्याची मागणी पत्रातून केली आहे.www.konkantoday.com