
कबुतरखान्यासमोरच्या जैन मंदिराशेजारी असणाऱ्या एका इमारतीच्या छतावर अनधिकृतपणे नव्याने कबुतरखाना सुरु
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महानगरपालिकेने दादरचा कबुतरखाना ताडपत्री टाकून पूर्णपणे झाकल्यानंतर आता जैन समाजाने कबुतरांना खाणे घालण्यासाठी नवीन जागा शोधल्याची माहिती समोर आली आहे.उच्च न्यायालयाने या परिसरात कबुतरांना खायला टाकू नये, असे स्पष्ट निर्देश देऊनही स्थानिक नागरिकांकडून हा आदेश धाब्यावर बसवला जात आहे. यापूर्वी फुटपाथवर पाच-पाच किलो धान्य टाकून ठेवणे किंवा कारच्या छतावर कबुतरांसाठी धान्याचा ट्रे ठेवणे, अशा युक्त्या स्थानिक जैनधर्मीय नागरिकांनी केल्या होत्या. मात्र, पोलिसांनी संबंधितांवर कारवाई केली होती. यानंतर आता स्थानिक नागरिकांनी कबुतरखान्यासमोरच्या जैन मंदिराशेजारी असणाऱ्या एका इमारतीच्या छतावर अनधिकृतपणे नव्याने कबुतरखाना सुरु केला आहे.
या इमारतीच्या छतावर कबुतरांसाठी धान्याची पोती रिकामी केली जात आहेत. त्यामुळे या इमारतीवर हजारोंच्या संख्येने कबुतरांचा थवा जमा होत आहे. याचा आजुबाजूला राहणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. या परिसरात कबुतरं जमू नयेत म्हणून पालिकेने कबुतरखाना बंद केला होता. मात्र, स्थानिक नागरिकांनी आता इमारतीच्या छतावर नवा कबुतरखाना सुरु करुन न्यायव्यवस्था आणि प्रशासनाला आव्हान दिले आहे.




