
ओळख महाभारताचीभाग ६धनंजय चितळे
भीष्मपितामहांकडून युधिष्ठिराला राजधर्माचा उपदेश
आपल्याला आठवत असेल की या लेखमालेच्या तिसऱ्या लेखात आपण युधिष्ठिराने जयद्रथाला क्षमा करून सोडून दिल्याचा संदर्भ वाचला होता. या गोष्टीला मी धर्मराजाकडून झालेली चूक असे म्हटले होते. त्या लेखानंतर मग राजाने कसे वागणे अपेक्षित आहे, ते समजून घेण्यासाठी आपण गेल्या दोन भागात विदुराच्या राजनीतीतील काही सूत्रे पाहिली. आता परमज्ञानी महावैष्णव पितामह भीष्म यावर काय विचार करतात, ते पाहू.
राजाने शत्रुपक्षाशी कसे वागावे? अपराध्याला क्षमा कधी करावी? त्याला कोणते शासन करावे? याबाबत भारतीय संस्कृतीच्या विविध स्मृतिग्रंथात मार्गदर्शन केले आहे. रामायणात प्रभू श्रीरामचंद्रानी भरताला आणि शूर्पणखेने रावणाला राजनीती सांगितल्याचे वाचायला मिळते. महाभारतामध्ये भीष्मपितामहांनी धर्मराजाला हे मार्गदर्शन केलेले वाचायला मिळते. युद्ध संपल्यानंतर भगवान श्रीकृष्णांच्या आज्ञेने आणि त्यांच्याबरोबर सर्व पांडव शरशय्येवर पडलेल्या भीष्म पितामहांना भेटायला गेले. त्यावेळी धर्मराज युधिष्ठिर आणि भीष्म यांच्यात संवाद झाला. तेव्हा पितामह म्हणाले, `धर्मराजा, राजाने नेहमी देवांची तसेच समाजातील विद्वानांची पूजा करावी. साधुसंतांचा नेहमी सन्मान करावा. आपले आप्त आपल्यासमोर युद्धाला उभे राहिले, तरी त्यांच्याशी युद्धच करावे. अशा वेळी त्यांना ठार मारले म्हणून राजाला पाप लागत नाही. राजाने सतत संतापू नये. त्याबरोबरच राजाने क्षमेचासुद्धा तारतम्याने उपयोग करावा, सरसकट क्षमा करणे योग्य नाही. राजाने दुष्टांना शासन करावे. त्याने राज्य हेच आपले घर आहे, असे समजून प्रजेशी प्रेमाने वागावे. गर्भवती स्त्री ज्याप्रमाणे आपल्या गर्भाचे रक्षण करते, त्याप्रमाणे राजाने प्रजेचे रक्षण करावे. प्रजेच्या संपत्तीचा लोभ धरू नये. त्यांची सुखदुःखे जाणून घ्यावीत. जे सैनिक युद्धामध्ये मृत्यू पावतील, त्यांच्या कुटुंबाची काळजी घ्यावी. कोणत्याही बाबतीत अतिरेक करू नये. नित्य सावधानता बाळगावी. कोणी काही भेटवस्तू दिली तरी ती नीट तपासल्याशिवाय त्याचा स्वीकार करू नये. आपल्या महालातील सेवक परीक्षा केल्याशिवाय नेमू नयेत. तसेच परीक्षा केल्याशिवाय कोणताही पदार्थ खाऊ नये. सेवकांचे वेतन वेळेवर द्यावे. एखाद्या सेवकाने काही विशेष काम केले असेल, तर त्याला प्रोत्साहन म्हणून बक्षीस द्यावे. याचकांना तृप्त करावे.मीच सर्वश्रेष्ठ राजा आहे’, असे कधीच मानू नये. सर्वांचा चालक परमेश्वर आहे, याची नेहमी जाणीव ठेवावी.”
वाचकहो, या सर्व सूचना वाचताना त्यांचे आत्ताच्या काळातही किती महत्त्व आहे, ते आपल्या ध्यानी येत असेलच. पूर्वी राजेशाही होती. आता लोकशाही आहे, म्हणून या सूचनांचे महत्त्व कमी होत नाही. जे देशाचे किंवा राज्याचे प्रमुख आहेत, त्यांनी या सूचनांवर सखोल चिंतन करायलाच हवे आणि त्याप्रमाणे वागायलाच हवे. बरोबर आहे ना?
आपल्याकडे यथा राजा तथा प्रजा' अशी एक म्हण आहे. लोकशाहीमध्येयथा प्रजा तथा राजा’ असेही दिसून येते. म्हणजे या सूचना आपणही अभ्यासून कृती केली पाहिजे. यासाठी रामायण-महाभारत हे ग्रंथ संपूर्ण आणि पुन्हा पुन्हा वाचले पाहिजेत. हभप विद्यावाचस्पती चारुदत्त आफळे बुवा यांच्यासारखे अभ्यासू कीर्तनकार जे सांगतात, ते काळजीपूर्वक श्रवण केले पाहिजे आणि आपल्याबरोबर युवा पिढीलाही कीर्तनांना आग्रहाने आणले पाहिजे.
(क्रमशः)




