
राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या आदेशाला संबंधित ठेकेदारांनी दाखवली केराची टोपली
गुहागर मार्गावरील मिरजोळी साखरवाडी, बौद्ध समाज स्मशानभूमीसमोर पडलेले खड्डे पेव्हर ब्लॉकने भरा, या राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या आदेशाला संबंधित ठेकेदारांनी केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे ग्रामस्थ स्वातंत्र्यदिनी या खड्ड्यांमध्येच उपोषणाला बसण्यावर ठाम आहेत. या उपोषणाला कोंढे, शिरळ ग्रामस्थांनीही पाठिंबा दिला आहे.
गुहागर मार्गावर साखरवाडी ते साई मंदिरापर्यंत जागोजागी खड्डे पडले असून रस्त्याची दुरवस्था झाली आहे. याचा ग्रामस्थांसह वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत असतानाच काही दिवसांपूर्वी दुचाकीचा अपघात होऊन महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्या महिलेवर अद्यापही मुंबईतील अपोलो रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याला आपला विभाग व ठेकेदार जबाबदार आहे. त्यामुळे आपल्याकडून या महिलेला त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी. हे सर्व खड्डे तातडीने भरले गेले
नाहीत तर १५ ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनी मिरजोळीतील काही ग्रामस्थ खड्डयांमध्ये, काही आपल्या कार्यालयासमोर तर काही पोलीस ठाण्यासमोर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीने प्रशासनाला दिला आहे.www.konkantoday.com




